( विजय जगताप)
कोरोना पासून वाचायचं तर एकमेकांपासून अंतर राखा हा जागतिक सिध्दांत परंतू असाही एक व्यवसाय आहे की जिथं शरीराला शरीर भिडल्याशिवाय पोटच भरता येत नाही, स्पर्शाशिवाय ज्यांना जगणंच अशक्य आहे अशा वेश्यांना स्पर्शापासून दूर व्हायला लावला कोरोनाने…! मग त्यांच्या पोटाचं काय? कारण स्पर्श हाच त्यांच्या जगण्याचा पाया असल्याने त्या आता काय करतील? कसा मार्ग काढतील? हे सारं आपल्या छायाचित्रणातून मांडून जगाचं लक्ष वेधून घेण्याची कामगिरी केली पिंपरी चिंचवडमधील देवदत्त कशाळीकर यांनी…!
पुण्याच्या बुधवार पेठमधील वेश्यांवर बनविलेल्या त्यांच्या फिल्मने आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाण घेत संपूर्ण जगाचं लक्ष या संवेदनशील विषयावर सध्या वेधलं आहे.अवघ्या सहा दिवसात २० लाखाहून अधिक लोकांनी हि फिल्म पाहिली असून बीबीसी न्यूजने(मराठी)प्रसारीत केलेली हि फिल्म देवदत्त कशाळीकर यांच्या विचारातून, कल्पनेतून व मांडणीतून काळीज हेलावून सोडत आहे.स्पर्श हाच जगण्याचा आधार असलेल्या वेश्यांच्या प्रश्नांचं कोरोना काळातील भीषण वास्तव मांडण्याचं धाडस करून त्यांनी मानवी देह व्यापार कोरोनाने कसा थांबवलाय ,हे अचूकपणे टिपलंय, त्यांच्या या कामगिरीची नोंद बीबीसीने घेऊन शहरातील या हरहुन्नरी कलाकाराचा एक प्रकारे सन्मान केला आहे.
जगातील १४८ देशात बीबीसी न्यूज नेटवर्कचे जाळे आहे. विश्वासार्हता,परिणामकारकता, व जागतिक महत्व या तीन निकषावर बीबीसीचे वृत्तसंकलन व प्रसारणाचे काम चालते.
राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रणाची अनेक पारितोषिके व सन्मान मिळविलेले देवदत्त कशाळीकर हे पिंपरी चिंचवड शहरातील नावाजलेले छायाचित्रकार..! छंद, आवड ,करीअर व सतत नवीन काहीतरी शोधण्याचा ध्यास हा त्यांच्या फोटोकलेचा आत्मा..! मनासारखी मोकळीक व स्वातंत्र्य नोकरीत मिळू शकत नाही हे ध्यानात आल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेतील कायम स्वरूपाची नोकरी सोडून देण्याचे धाडस करून त्यांनी पहिला मोकळा श्वास घेतला.
ते फक्त फोटो काढत नाहीतर त्या फोटोबरोबर जगतात,एखादं दृश्य मनासारखं टिपण्यासाठी वाट्टेल ती मेहनत करण्यासाठी सदैव तयार व तत्पर असतात.कोरोना झालेल्या रूग्णांचे अंत्यविधी ही थरकाप उडविणारी पहिली फोटो फिचर थीम त्यांनी केली.त्याद्वारे माणूसकी, नातेसंबंध, व्यवहार व जगण्याच्या धडपडीचे चित्रण मांडलं, त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेली मग त्यांनी वेश्यांचं कोरोनाकाळातील जगणं जगासमोर आणलं,या दोन्ही फोटो फिचर न्यूज व फिल्म बीबीसीने प्रसारीत केल्या.दररोज लाखो लोक त्या पहात आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदा फोटोगार्फीचे स्कूल उघडून आज ते शेकडो जणांना या कलेतून घडविण्याचे काम करतात. यापूर्वी त्यांनी काश्मीरमधील लेह लडाख, यमुनेच्या तीरावरील जगप्रसिद्ध ताजमहाल, कर्नाटकमधील हंपी हि स्थळे टिपून छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून ती नव्याने उलगडून दाखविण्याचे काम केले आहे.
जागतिक दर्जाच्या तोडीचे काम करत शोधक नजर,अभ्यास, व प्रचंड मेहनत करून या स्थानावर पोहोचलेले पिंपरी चिंचवडचे ते पहिले छायाचित्रकार आहेत.