कोणावर कधी आणि कसले संकट कोसळेल याचा काही नेम नाही, नियतीने बाॅलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याच्यावर अशी काही वेळ आणली तिथे पैसा देखील काहीच करू शकला नाही.
वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खानचे आज मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात निधन झाले. न्यूरोएंडोकार्ईन ट्युमर ( कॅन्सर)शी तो जवळपास तीन वर्ष लढत होता. दूर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या आईचे शनिवारीच रात्री ९ वाजता जयपूर येथे निधन झाले होते. लाॅकडाऊन असल्यामुळे तो मुंबईतून आईच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही. मोबाईलवर व्हिडीओ काॅन्सफरन्सवर त्याने आपल्या आईचा अंत्यविधी पाहिला. खचलेल्या व कोलमडून पडलेल्या इरफानने त्याही स्थितीत स्वत:ला सावरले मात्र काल रात्री ( मंगळवारी) त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने थेट आयसीयू मध्ये दाखल व्हावे लागले.
बाॅलिवुडला व त्याच्या चाहत्यांना त्यामुळे फार मोठा धक्का बसला आहे. आपल्या सहज व नैसर्गिक अभिनयाने त्याने आपली स्वतंत्र प्रतिमा इंडस्ट्रीत निर्माण केली होती.
हिरो व खलनायक न बनता चतुरस्त्र अभिनयाची मधली रिकामी असलेली स्पेस त्याने व्यापली होती. मध्यमवर्गीय चेहरा, आवाजाची विशिष्ट ढब यामुळे हिरो होण्यासाठी नाचगाणी करण्याची आवश्यकता नाही हे त्याने दाखवून दिले होते. आजची आघाडीची नायिका दिपिका पदूकोन बरोबर पिकू मध्ये तो तिचा नायक म्हणून शोभला होता.