(विजय जगताप)
पुन्हा एकदा अवजड उद्योग खाते सेनेच्या माथी मारून मोदी सरकारने आपल्या मित्रपक्षाचं अखेर पुन्हा एकदा अवघड दुखणं करून टाकलं. आता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायची पाळी सेनेवर या निमित्ताने आली आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी, ‘मिळालेल्या खात्याविषयी समाधान व्यक्त करत आपल्या पक्षाची कुठलीही नाराजी नसल्याचे जरी म्हटले असले तरी ठसणारी वेदना तमाम शिवसैनिकांना बोचत असल्याची सार्वत्रिक भावना आहे. काल जाहीर झालेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपामध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले तरी अवघ्या एक कॅबिनेट खात्यावर सेनेची बोळवण करून टाकण्यात आली. शिवाय ट्रेडमार्क असल्यासारखं अवजड उद्योग खाते सेनेला देऊन एकप्रकारे ‘तशीही तुमची आवश्यकता नाही, मिळेल ते पदरात पाडून घ्या’ असा सूचक इशाराही भाजपने दिला. २०१४ पासून मागील साडेचार वर्षात सेनेने केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही भाजपवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मित्रपक्षाकडून होणारे हल्ले सहन करीत भाजपने मात्र सेनेला न दुखावण्याचीच भूमिका घेत योग्य वेळ संधीची वाट पाहणे पसंद केले. मागील टर्ममधील मोदी सरकारच्या प्रत्येक धोरण व भूमिकेवर टिका करीत सेनेने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंखाखाली जाण्याचाच मार्ग निवडला.
साडे तीन दशकांपूर्वी सेनेच्या सावलीत भाजप वाढत असतानाच तत्कालीन भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी १९८५ च्या सुमारास सेनेबरोबर युती केली. सेनेचे महाराष्ट्रात असलेले वजन, बाळासाहेब ठाकरे या नावाचा दरारा या छत्रछायेखाली धाकटं होणं पसंत केलेल्या भाजपने काळाच्या ओघात सेनेला कधी मागं टाकलं ते सेनेलाही कळलं नाही. २०१४ ला तर भाजप थोरला व सेना धाकटं भावंडं ठरलं ! मात्र आपण धाकटे ठरलोय, ही अवस्थाच सेनेला सहन न होणारी होती. अखेर काळावर भाजपने विजय मिळविला. मोदी बहुमताच्या जवळ पोहोचत नाही त्यामुळे आपले महत्त्व वाढेल व बार्गेनिंग पॉवर वाढवता येईल या कल्पनेत एनडीएतील सारे घटक पक्ष राहिले खरे मात्र सर्वांचा मुखभंग झाला. ३०३ जागा स्वबळावर मिळावित भाजपने विरोधकांनाच नाही तर आपल्या मित्रपक्षांनाही अस्मान दाखविलं.
नितीशकुमार यांनी मात्र १६ जागा जिंकूनही एक मंत्रीपद वाट्याला येणार हे कळताच आपला ताठ कणा दाखविला. सेनेची अवस्था मात्र सहनही होईना आणि सांगताही येईना’ अशी झाली.
आता पुन्हा भाजपवर गुरगुरण्याची सेनेचा वाघाची सोयच मोदी व शहा जोडीने ठेवली नाही. सेनेची नखे व दात एकाचवेळी काढत आमच्यामुळे तुम्ही १८ जागांवर आहात तुमच्यामुळे आम्ही नाही, हे दाखवून दिलं आहे. दोस्तीत राहूनही नांगी ठेचून काढावी असा हा प्रकार घडला. सई ताम्हणकर या अभिनेत्रीचा ‘क्लासमेंट’ या मराठी पिक्चरमधला एक डायलॉग आहे… ‘चड्डीत राहायचं… जास्त आवाज नाही’ हा डायलॉग यानिमित्ताने आता सेनेला फिट्ट बसला आहे.