( विजय जगताप)
गेल्या चार दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहराचे संपूर्ण राजकारण विश्व व महापालिका वर्तुळ हादरवून टाकलेल्या ॲन्टीकरप्शनच्या धाडीमुळे व पाच जणांच्या अटकेमुळे शहर भाजपचा गाडा हाकणारे पुरते ‘हॅंग’मध्ये गेले आहेत. स्वप्नातही कल्पना न करता येणा-या अशा या प्रकारच्या परंतू घडलेल्या सत्य घटनेमुळे भाजप जाळयात सापडल्याने विरोधकांच्या गोटात आनंदाच्या उकळया फुटू लागल्या आहेत.
‘बुॅंद से जो गयी वो हौद भरके वापस नही आती…’अशा अर्थाची बिरबल -बादशहा यांच्या काळातील एक म्हण आहे.अब्रू एवढूशी गेली काय अन् भली मोठी गेली काय…एकूणच एकच असते असं म्हणता येणारी घटना आता घडून गेली आहे.शहर भाजपचे चाणक्य असलेले दोन आमदार या परिस्थितीतून आता कसा मार्ग काढतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.’नियोजनबध्द रचण्यात आलेलं षड्यंत्र ‘असे म्हणण्याशिवाय भाजपेयींना पर्याय नसल्याचे दिसत आहे.कारण लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या स्थायी अध्यक्षांच्या पीएंनी आपण हे पैसे स्थायी समिती अध्यक्ष यांच्या सुचनेवरून स्विकारले व समितीतील सोळा सदस्यांना ते वाटावे लागतात अशी माहिती दिल्याने घडलेली हि घटना खोटी आहे, किंवा अफवा आहे , असे सांगताच येत नसल्याचा मुक्का मार भाजपला बसला आहे.
येत्या दोन दिवसात जामीन मिळून हे सर्वजण सुटतील काही दिवसांनी लोकं हे सारं विसरून जातीलही …परंतू इतिहासात प्रथमच अशा प्रकारचीही कारवाई होऊ शकते हे ध्यानात आल्याने आता यापुढे स्थायी कशी चालवायची ? ठेकेदारांकडून टक्केवारी कशी स्विकारायची ? रिंगा कशा करायच्या ? चांगला ठेकेदार कसा ओळखायचा? पैसेच खायचे नाही असे ठरविले तर पक्ष कसा चालवायचा? तुंबडी कशी भरायची? अशा सा-या प्रश्नांना १८ जानेवारी २०२२ पर्यंत चालणा-या शेवटच्या स्थायी समिती बैठकीपर्यंत काळजावर दगड ठेऊन भाजपला गाडा हाकावा लागणार आहे.
भाजपवर पडलेला हा डाग आता निवडणूक ऐन तोंडावर आली असताना तो पुसता पुसता पक्षाची पुरती दमछाक होणार, हे आता त्रिकालबाधित सत्य ठरले आहे.
इतिहासात प्रथमच एखादया स्थायी समिती अध्यक्षास अटक होणे आणि तो देखील प्रतिष्ठीत गाववाला असणे…त्यांना वाचवता न येणे…या सा-या घटना घडामोडींमुळे भाजपला हतबल होण्याशिवाय पर्याय नसणे यासारखी दुसरी कुठली शोकांतिका नाही.
एखादा विषय मंजूर होणे आणि स्थायीची त्यावर मोहोर उमटणे ही खरे तर अतिशय सोपी व सर्वसाधारण प्रक्रिया…! बीपीएमसी ॲक्ट ( महापालिका कायदा) अस्तित्वात आल्यापासूनची अतिशय साधी व नियमित प्रक्रिया म्हणून ती ओळखली जाते.
परंतू नेमक्या या प्रक्रियेत पैशाची नदी वाहते व दरवर्षी या होडीत चढणा-या सर्व प्रवाशांना दर आठवडयातून त्या पाण्याची आंघोळ घालायची कामे स्थायी अध्यक्षाला करावी लागतात. म्हटली तर ही तशी अतिशय साधी व नियमित बाब …! परंतू ठेकेदार व कामाचे स्वरूप बघून फाईलवर दोन टक्के , तीन टक्के पैसे खाणे ही जणू कायदेशीर दंडक ठरलेली प्रक्रिया भाजपची पुरती अब्रू घालवणारी ठरली आहे. तर केवळ आणि केवळ प्रतिष्ठेसाठी हे पद स्विकारलेल्या नितीन लांडगे यांच्या राजकीय घराण्याच्या उंचीवर ओरखडा काढून गेली आहे.