( विजय जगताप)
अवघ्या ९० दिवसांपूर्वी शिवसेनेत येणं, मावळ मधील सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार नसणं, ना संसदीय राजकारणाचा अनुभव ना नावाला वलय ना करिष्मा घडून आणण्याची ताकद… तरी देखील अनुभवी व मातब्बर उमेदवाराला टक्कर देणाऱ्या संजोग वाघेरे यांनी ५ लाख ९६ हजार २१७ घेऊन मावळवसियांच्या हृदयात “हार के भी जीत हुयी” या वाक्याचा प्रत्यय रूपी आनंद आज सर्वांना दिला.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी निकालामध्ये मावळ मतदार संघातून शिवसेनेचे ( शिंदे गट) श्रीरंग बारणे हे ६ लाख ९२ हजार ८३२ मते मिळवून विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याची हॅट्रिक त्यांनी मिळविली आहे. तर एक माजी नगरसेवक व २९ वर्षापूर्वी भुषविलेले महापौर पद एवढाच बायोडेटा असलेल्या संजोग वाघेरे या खासदार बारणे यांच्या तुलनेत अतिशय नवखे असलेल्या व सरळ साध्या स्वभावाच्या माणसाने सुमारे ६ लाख इतकी मते घेऊन उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पाया केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघात मजबूत केला आहे. निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर प्रारंभी सर्वांना एकतर्फी भासणारी परंतु शेवटी शेवटी प्रचंड चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीतील निकालाने खासदार बारणे यांच्या आत्मविश्वासाला तडा दिला आहे. दहा वर्षांचा खासदारकीचा अनुभव, लोकसंपर्काचे प्रचंड नेटवर्क, राज्यात व देशात असलेल्या सत्तेचे वलय अशी पार्श्वभूमी असलेल्या बारणे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाघेरे यांना अदखलपात्र ठरवलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानभूतीची लाट व बारणेंविषयी असलेली नाराजी या निकालाने सिद्ध झाली आहे. बारणे यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध त्यांच्यात सहकारी मित्र पक्षाच्या मावळ तालुक्यातील आजी व माजी आमदारांनी केला होता, मात्र महायुतीचा धर्म म्हणून नंतर त्यांना शांत बसावे लागले होते. परंतु याचा परिणाम म्हणजे जनतेला जो मेसेज पोहोचायचा होता तो योग्य पोहोचला गेला. बारणे विजयी झाले असले तरी २०१४ मध्ये लक्ष्मण जगताप यांना २०१९ मध्ये पार्थ अजित पवार यांना पराभूत केल्याच्या अभिमानरुपी आनंदाची नशा आजच्या विजयी निकालाने पुरती कोमजली आहे. कारण “आपण अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणारच “असा ठाम दावा दहा दिवसांपूर्वी करणारे बारणे यांना केवळ ९६ हजारांच्या लीडने विजय मिळविता आला आहे.
वाघेरे हे पराभूत झाले असले तरी नियोजनाचा अभाव आणि पारिवारिक मंडळींकडेच सर्व यंत्रणा त्यांनी सोपविल्याने त्याचा फटका त्यांना बसला आहे.