विजय जगताप
काल ‘बातमी खास’ने पार्थच उमेदवारी मिळविणार या बद्दलचे केलेले विश्लेषण आज खरे ठरले. अपेक्षेप्रमाणे मावळमधून त्यांची उमेदवारी आज अधिकृतपणे जाहीर झाली आहे. शरद पवार यांची तिसरी पिढी खऱ्या अर्थाने पार्थच्या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आता उतरली आहे.
२९ वर्षीय पार्थ पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले असून पुढे त्यांनी इंग्लडमध्ये लॉ (वकिली) चे शिक्षण पूर्ण केले आहे. घरातच असलेला राजकीय वारसा तसेच आई सुनेत्रा अजित पवार यांचे माहेरही राजकारणातच असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना जन्मतःच लाभले आहे. पार्थ यांचे सख्खे मामा माजी मंत्री, माजी खासदार, पद्मसिंह पाटील हे आहेत. शेती, सहकार, उद्योग व्यवसाय, कारखाने, कंपन्या आणि राजकारण या सहा क्षेत्रांचा कोळून अभ्यास, सहवास व वारसा लाभलेले हे व्यक्तिमत्व आहे.
तीन कंपन्यांचे डायरेक्टर – पार्थ पवार हे पवार घरण्यातील तीन कंपन्यांचे संचालक, म्हणूनही जबाबदारी सांभाळतात. सू तारा ॲग्रो, अनंता कन्स्लोडेट व एफपी रियॉलिटी अशी या तीन कंपन्यांची नावे आहेत.
लाथ मारेल तो धंदा-व्यवसाय वा कुठल्याही क्षेत्रात उडी मारण्याची क्षमता व ताकद असलेल्या पार्थ यांनी अखेर राजकारणाचीच वाट धरली हे विशेष म्हणावे लागेल. त्याची अप्रत्यक्ष चुणूक २०१४ साली त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षी दिसून आली. २०१४ ला खासदारकी लढवित असलेल्या आपल्या मामाच्या (पद्मसिंह पाटील) प्रचारात त्यांनी प्रत्यक्ष उडी मारून कॅम्पेनिंग चांगल्या प्रकारे केले होते.
आपल्या वडिलांप्रमाणेच (अजित पवार) बोलण्याची स्टाईल व आवाज असलेल्या पार्थ यांना रागही आपल्या वडिलांसारखाच येतो. १ जुलै २०१३ ला मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये पार्थ यांचा मित्रांबरोबर किरकोळ वाद झाला. वादाचे पर्यावसन मध्यरात्री त्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या डस्टर (कार) गाडीची तोडफोड करण्यापर्यंत पोहोचले होते. हे प्रकरण फोर्ट भागातील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यापर्यंत गेले खरे मात्र तेव्हा अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने हे प्रकरण गुन्हा दाखल होता-होता शमले होते.
मागील वर्षापासून आपले आजोबा शरद पवार यांच्या बरोबर बारामतीतील तसेच राज्याच्या विविध भागात ते फिरत आहेत. राष्ट्रवादीत तरुणांची संख्या वाढविण्यासाठी शरद पवार करत असलेला प्रयत्न हा फारसा कोणाच्या लक्षात येत नव्हता. मात्र तरुणांना पार्थबद्दल आकर्षण आहे, हे दिसून येत होते. एकप्रकारे आजोबांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ हे राजकारणाचे धडे गिरवत होते. ३ डिसेंबर २०१८ ला कोकण दौऱ्यावर जाताना तर शरद पवार यांनी आपली तीनही नातवंडे बरोबर घेतली होती. पार्थ अजित पवार, रोहित पवार व योगेंद्र श्रीनिवास पवार या तिघांनी परशूरामाची भूमी असलेल्या कोकण दौऱ्यात आपल्या आजोबांबरोबर महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल समजून घेतला होता. यावेळी नारायण राणे यांच्या घरी देखील हे सर्वजण तेव्हा गेले होते.
पार्थ हे आता मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांची लढत शिवसेनेबरोबर असल्याने ही जागा जिंकणे ही वडील अजित पवार व आजोबा शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई असल्याने राज्यच नाही तर देशाचे लक्ष या निकालाकडे लागणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.
पिंपरी चिंचवडची वेसन हाती घेण्यासाठी पार्थ ‘चाल…’ – तब्बल २० वर्षे पिंपरी चिंचवडची सत्ता हाती असलेल्या अजितदादांच्या ताब्यातून दोन वर्षांपूर्वी महापालिका सटकली. ते शल्य कायम शरद पवार व अजित पवार यांना ठसत आले आहे. खासदारकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही वेसन हातात घेण्यासाठी पार्थला उमेदवारी देऊन नेतृत्व पुर्नप्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आहे.