कोणी त्यांना नवीन समजा, दोन महिने झालेत राजकारणात येऊन अशी चेष्टा करो; परंतू त्यांच्या प्रत्येक हालचालीची व कृतीची आज बातमी होत आहे. राष्ट्रवादी या राष्ट्रीय पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या अजित पवार यांचे ते चिरंजीव असणे ही त्यांची ‘आयडेंटी’ आहे.
आज दुपारी राष्ट्रवादीच्या पहिल्या दहा उमेदवारांची नावे जाहीर झाली. पार्थ यांचे मावळसाठी त्यामध्ये नाव नव्हते. मात्र जयंत पाटील जेव्हा पत्रकार परिषद घेत होते, तेव्हा पार्थ पवार तळोजा येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला सहकाऱ्यांच्या भेटी-गाठी घेत होते.
नोव्हेंबर २०१८ ला ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी सांगवी येथे नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने घेतलेल्या पहिल्या कार्यक्रमात पार्थ पवार पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पार्थ या नावाला ‘पवार’ या आडनावाची जबरदस्त ताकद आहे. आजोबा शरद पवार व वडील अजित पवार या वलयामुळे सर्वसामान्यांपासून प्रत्येकाला पार्थबद्दल कुतूहल आहे. २८ जानेवारीला सांगवी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांचे ‘उठ पार्था’ अशी भेदक भाषणाची किंकाळी जनतेला बरंच काही सांगून गेली होती.
त्यानंतर त्यांचे वाढलेले पिंपरी-चिंचवड व मावळ दौरे नंतर शरद पवार यांनी त्यांच्यासाठी निवडणूक न लढविण्याची केलेली घोषणा, दरम्यानच्या काळात चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात त्यांनी टेकलेला माथा, परवाच्या मंगळवारी उरण येथील दर्ग्यामध्ये चढवलेली चादर तर काल एकवीरा देवीला घातलेले साकडे पाहता त्यांची नेमकी मुव्हमेंट आता सिद्ध होत आहे.
काल (बुधवारी) रात्री खोपोली येथे अजितदादांबरोबर व तेथील कार्यकर्त्यांची साधलेला संवाद तर कालच दुपारी पनवेल येथे अजितदादांनी शेकापच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी न बोलता बऱ्याच गोष्टी सांगून जात असल्याचे चित्र आहे.