आॅक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील जेजूरी व रांजणगाव या दोन औद्योगिक वसाहतीत प्लांन्टसाठी वीज यंत्रणा उभारण्याच्या तयारीसाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी युध्दपातळीवर काम करीत आहेत.
जेजूरी एमआयडीसीमध्ये कायचंद्रा आयर्न इंजिनियरींग तर रांजणगाव एमआयडीसीत आॅक्ली एअर नॅचरल रिसोर्सेस हे दोन नवे प्रकल्प आॅक्सिजनची निर्मिती करणार आहेत.
कायचंद्राची दैनंदिन आॅक्सिजन निर्मितीची क्षमता १२.५ मेट्रिक टन, तर आॅक्सी एअरची दैनंदिन क्षमता ०८ मेट्रिक टन इतकी आहे.या दोन्ही प्रकल्पांकडून नव्या वीजजोडसाठी महावितरणकडे २२ एप्रिल रोजी अर्ज येताच तातडीने कार्यवाहीचे काम हाती घेण्यात आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दोन्ही ठिकाणी त्वरीत वीज देण्यासाठी कर्मचारी व अधिका-यांना आदेश दिल्याने येत्या चार दिवसात दोन्ही ठिकाणचा वीजपुरवठा कार्यान्वित होणार आहे . ऊर्जामंत्री डाॅ नितीन राऊत यांच्या स्पष्ट सुचना आम्हास असल्याने आम्ही या प्रकल्पांना वीजपुरवठा देऊन कोरोना या गंभीर संकटकाळात मदतीचा हात देणार असल्याचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.