विजय जगताप
पिंपरी चिंचवड शहरातील गंभीर कोरोना स्थिती हाताळण्यासाठी अधिका-यांची टिम नेमत जबाबदारीचे वाटप करणे, कोरोनासंबंधित प्रत्येक खर्चिक निर्णय विद्युतवेगाने घेणे,समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी कोविड रूग्णांची भेट घेणे, शहरासाठी आॅक्सिजन रातोरात उपलब्ध करणे आदी कामांच्या झपाटयाने आयुक्त राजेश पाटील हे ‘ॲक्शन मोड’ वर असल्याचे समाधानकारक चित्र शहरात दिसून येत आहे.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतलेल्या आयुक्त पाटील यांनी कोरोना संकट निवारण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत आखलेले सर्व प्लॅन यशस्वी ठरत असल्याचे आढळून येत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी शहरातील आॅक्सिजनचा साठा संपत असल्याचं स्पष्ट झाल्याने वेगाने त्यांनी यंत्रणा हलविली व आॅक्सिजनचे दोन टॅंकर शहरासाठी आणले.शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील रूग्ण व नातेवाईकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी थेट रूग्णांशी संवाद साधण्याचा त्यांचा निर्णय सर्वांनाच आवडला.
वर्ग एकपासून वर्ग तीन पर्यंतच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांची वर्गवारी करून समित्या नेमत त्यांची जबाबदारी व कर्तव्ये निश्चित केल्याने एक टिम वर्क निर्माण झाले आणि त्याचा अपेक्षित रिझल्ट हळूहळू आता दिसू लागला आहे.
आॅक्सिजन कमिटी, विभागीय आयुक्त,तसेच जिल्हाधिकारी यांच्यांशी संवाद कमिटी, प्रवक्ता नेमणूक, मिडिया कमिटी, सर्व क्षेत्रीय कार्यालये संपर्क प्रमुख नेमणे,लसीकरण टिम, कोविड सेंटरचे व्यवस्थापन समिती अशा सूत्रबद्ध कामकाज वाटप पध्दतीमुळे जबाबदारी दिलेले अधिकारी व कर्मचारीदेखील आपले कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा करत नसल्याचे दिसून येत असून दिवसभरातील कामकाजाचे रिपोर्टींग करावयाचे असल्याने अधिका-यांना घरी जायला रोज रात्रीचे अकरा वाजत अाहेत.
पंधरा दिवसांपूर्वी एकाच दिवशी २५ हजार जणांचे लसीकरण करण्याचा आयुक्त पाटील यांचा निर्णयही टिमवर्कमुळे यशस्वी झाला होता. पालिकेच्या फेसबुकलाईव्ह वर मार्गदर्शनासाठी येणे, कोरोना वाॅर रूमची यंत्रणा नागरिकांशी संवाद साधते की नाही हे तपासणे, होम आयसोलेशन झालेल्या सर्व रूग्णांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारणे आदी कामांचा वेग व उरक निश्चित करणे व या सा-यांवर नियंत्रण ठेऊन आढावा घेणे अशी दैनंदिन कामकाज साखळी आयुक्तांनी आखली आहे.
मागील आठवडयातच नगरसेवक व महापौरांनी मागणी केल्यानंतर मृत झालेल्या रूगणांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरपण, कोविड रूग्णांना जेवणात अंडी व शेंगदाणा लाडू देणे, प्लाझमा डोनरसाठी दोन हजार रूपये देणे याचबरोबर शहरातील हातावर पोट असलेल्या सर्व घटकांसाठी तीन हजार रूपये मदत देण्याचा निर्णयही त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार त्वरीत अंमलात आणला.