विजय जगताप –
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ असे म्हणतात ते उगीचच नाही. पिंपरी चिंचवड महापालिका शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शांताबाई गायकवाड यांनी शिक्षणरूपी संस्काराची धार आपल्या पाचही मुलांवर तेज केली. आणि त्याचे फळ म्हणून त्यांची नातवंडे, परतुंडे आज युरोप, अमेरिका, फ्रान्स, स्विडन, ऑस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी, जपान, मलेशिया, स्वित्झर्लन्ड आदी देशात शिक्षण, नोकरी, अभ्यासदौरे, सहली तसेच व्यवसाय क्षेत्रात ‘सबसे तेज उडान’ घेत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे ग्रीन कार्ड धारक मुले-मुली असलेल्या या कुटुंबाचा काफिला आपल्या भारतीय बांधवांना विशेषत: मराठी मुला-मुलींना शिक्षण तसेच नोकरी-व्यवसायात मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी अग्रभागी असतो. एक (दलित) बौद्ध कुटुंबाची ही विश्वव्यापी झेप प्रेरणादायी तर आहेच शिवाय अभिमानाने पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावणारी आहे.
शांताबाई दादासाहेब गायकवाड (वय वर्षे ८८) असे या वटवृक्षाचे नाव आहे. खेड तालुक्यातील भोसे हे त्यांचे मूळ गाव. भारतीय स्वातंत्र्याची पहाटही झालेली नसताना १९४० च्या सुमारास इयत्ता तिसरीच्या आख्ख्या वर्गात शिकत असलेली एकच मुलगी म्हणून त्यांची म्हणून त्यांची नोंद झाली होती. ‘पोरीला शिकून काय करायचं?’ असा समाजातील मतप्रवाह असतानाच्या काळात शांताने शिक्षणचा ध्यास घेतला. आपल्या बरोबर शिकायला एकही मुलगी नसतानादेखील मुलांच्या शाळेत शिकून खेड दोंदे वाडा या गावी जावून सातवीपर्यंतचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. दोन वर्षाचे ज्युनिअर ट्रेनिंग पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या शाळेत १९५१ साली त्या प्राथमिक शिक्षिका झाल्या. १९५६-५७ ला जुन्नरहून चिंचवडला बदली ऑर्डर मिळाली. तेव्हांपासून चिंचवडलाच त्या स्थायिक झाल्या. १९७० मध्ये चिंचवडची शाळा पिंपरी चिंचवड नगरपालिकेत समाविष्ठ झाली. त्यांचे पती दादासाहेब गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्व दोघांनीही आपल्या विद्याधर, शारदा, अविनाश, अशोक आणि छाया या पाच मुलांना नुसतेच शिक्षण दिले नाही तर सुसंस्कारीत केले. त्याचा परिणाम म्हणजेच या पाचही मुलांची एकूण १४ मुले-मुली आज इंजिनिअर, डॉक्टर, मॅनेजर, प्राध्यापक, व्यवसायिक होऊन भारतात आणि बाहेरील देशात विविध क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये मोठया पदांवर अधिराज्य गाजवित आहे.
शांताबाईंचा थोरला मुलगा विद्याधर याचा मोठा मुलगा हर्षद आणि त्याची पत्नी रश्मी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्विडन देशात इंजिनिअर म्हणून ये-जा करतात. विद्याधरची कन्या प्राजक्ता इंग्रजीमाध्यम शाळेत उपप्राचार्य आहे. आणि तिसरा मुलगा ऋषी याची स्वत:ची कंपनी आहे. त्याची पत्नी मयुरी ग्राफीक डिझायनर आहे.
शांताबाईंची द्वितीय कन्या शारदा रामचंद्र लोंढे या तर आपली आई ज्या महापालिकेच्या शाळेतून मुख्याध्यपिका म्हणून सेवानिवृत्त झाली त्याच पिंपरी चिंचवड महापालिकेतून सहाय्यक प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांच्या तीनही मुलांची, नीरज कविता आणि निरंजन ची भरारी अजूनच चकीत करणारी आहे नीरज अमेरिकेत सिस्को कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करीत आहे तर त्याची पत्नी स्मिता एम.एस. चे उच्च शिक्षण घेत आहे. डॉ कविता एम.बी.बी.एस. डिजीओ असून तिचे पती डॉ. प्रमोद रासु कांबळे एम.डी. (मेडिसिन) आहेत. त्यांनी करमाळा, सोलापूर येथे भव्य रुग्णालय उभारले आहे. तसेच डॉ. प्रमोद यांनी ४० पेक्षा जास्त देशांचा दौरा केला आहे. याचे कौतुक सर्वांना आहे. तिसरा मुलगा निरंजन एम.एस. असून अमेरिकेत कॅटर पीलर कंपनीत ध्वनीतज्ञ म्हणून कार्यरत आहे. निरंजनची पत्नी शाश्वती एम.एस. असून बिल गेट्स च्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत आहे.
शांताबाईंचा तिसरा मुलगा अविनाश याची तीन मुले अनुक्रमे प्रीतम, ज्योती. जीवन हे भारतात असून नामांकित कंपनीत कामाला आहेत. ज्योतीचे पतीही उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रीतम फोटोग्राफीचा व्यवसायही करतो.
शांताबाईंचा चौथा मुलगा अशोक यांना संदेश, संघमित्रा आणि भूषण ही तीन मुले. संदेश चिंचवडमध्ये फोटोग्राफी व्यवसायात आहे. त्याची पत्नी दीक्षा उच्च शिक्षण घेत आहे. अशोक ची मुलगी नुकतीच ऑस्ट्रेलियात एम.एस. करून आता ती आय टी कंपनीत पुण्यात आहे, तर तिचे पती यश थोरात उद्योजक आहेत. भूषण सध्या ऑस्ट्रेलियात असून त्याने ही एम.एस. पूर्ण केले आहे व तो पुढील शिक्षण घेत आहे.
शांताबाईंची पाचवी मुलगी छाया एम.ए.बी.एड. असून नुकतीच आळंदीच्या ज्ञानेश्वर उच्च महाविद्यालयातुन उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाली आहे. तिची मुलगी प्रिया एम.ए.एम.एड. असून ती संगणक क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करीत आहे. प्रियाचे पती प्रवीण पिंपळखरे इंजिनिअर असून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. छायाचा मुलगा स्नेहल मुकुंद सोनवणे एम ई असून सध्या एम बी ए करीत आहे. शांताबाईंनी आपल्या आयुष्यात शिक्षणाला दिलेले महत्त्व व रूजवलेला पाया आज मोठया फांदयांप्रमाणे वाढला आहे. आज वयाच्या ८८ व्या वर्षी शांताबाई पिंपरीहून चिंचवडला गेल्या सारखे कधी ऑस्ट्रेलिया तर २ दिवसात जर्मनी तर ६ दिवसात अमेरिका अशी भरारी आनंदाने मारत आहे.