हातावर पोट असलेल्यांसाठी पिंपरी महापालिकेने उभारलेल्या घरकुल संकुलामधील नागरिक स्वत:ची काळजी घेण्यात मात्र ‘सबसे तेज’असल्याचे दिसून आल्याची घटना आज आढळून आली. दूर्बल घटकातील लोकांसाठी महापालिकेने घरकुल योजना राबविली. जवळपास १५५ इमारती असलेल्या घरकुलमध्ये साडेसहा हजार कुटूंबे आजमितीस राहतात. सध्या ५ इमारती बांधून पुर्ण असून त्यांचे सदनिका वाटप व्हायचे आहे.
लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वी जेव्हा परदेशातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत होते. तेव्हा आयुक्तांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम घरकुलच्या या मोकळया इमारती आल्या होत्या. मात्र एकजूटीने व संघभावनेने राहत असलेल्या येथील रहिवाश्यांनी पालिका प्रशासनाचा डाव उधळून लावला होता. योगायोगाने पुढे तबलिगीवरून आलेल्या काही नागरिकांमुळे व त्यांच्या संपर्कात घरकुलचे काही नागरिक आल्याने येथे दोन कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. पर्यायाने घरकुल परिसर सील करावा लागला होता. अगोदरच समाजाचा, पालिका प्रशासनाचा घरकुलकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामुळे हा परिसर सतत चर्चेत आलेला आहे.
मात्र स्वच्छता व फिजिकल डिस्टीक्शनचे स्तोम गाजविणा-यांपेक्षा या परिसरातील नागरिक इतरांपेक्षा किती दक्ष आहेत हे येथील सहयोग ए-३ सहकारी गृहरचना संस्थेने हे दाखवून दिले आहे. वर्गणी काढत सुमारे २५ हजार रूपये खर्च करून या सोसायटीने हॅन्डवाॅश मशीन व सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवून ‘आम्ही दक्ष आहोत तुम्ही दक्ष व्हा ‘असा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे.