धडकी भरावी अशी जागा असलेल्या पिंपरीतील एच. ए. ग्राऊंडवर वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा उद्या (सोमवारी) होत असून सर्वच राजकीय पक्षांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.
‘हार्ट ऑफ सिटी’ अशी ओळख असलेल्या या ग्राऊंडवर राजकीय सभा घेणे हे मोठे आव्हान समजले जाते. ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पिंपरी विधानसभा मतदार संघात येत असलेले हे ग्राऊंड व येथे झालेली मोदींची सभा मात्र भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांना विजय प्राप्त करून देऊ शकली नव्हती. भव्य दिव्य कार्यक्रम व सर्वोच्च पद असलेल्या राजकीय नेत्यांच्या सभांसाठी या ग्राऊंडचा आजपर्यंत वापर केला गेला आहे. २०१६ ला झालेल्या ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झाले होते.
ऊर भरावा, धडकी भरावी असे हे ग्राऊंड आता वंचित बहुजन आघाडीसाठीच्या सभेसाठी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी जाणिवपूर्वक निवडले आहे. केवळ आंबेडकरी समाजच नव्हे तर बहुजन समाजातील उपेक्षित अशा सर्वच वर्गांना या सभेचे कुतूहल आहे. २९ ऑगस्ट २०१८ रोजी ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएम पक्षासोबत जाण्याची घोषणा केली आणि केवळ राज्याचे नव्हे, तर देशभर त्याचे पडसाद उमटले.
प्रकाश आंबेडकर यांची तत्वनिष्ठ भूमिका व दलितोत्तर राजकारणाचा पाया रचण्याचा अजेंडा व धडपड देशभर चर्चिली गेली आहे. त्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते थेट नातू असणे व उच्चशिक्षित असणे कायमच आंबेडकरी व बहुजनांच्या हृदयसिंहासनावर ठसत गेले आहे. उद्या होणारी त्यांची सभा राज्यातील दहावी सभा असणार आहे. यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कल्याण येथील सभांनी गर्दीचे विक्रम मोडले आहे. ही सभा पिंपरी चिंचवडमध्ये व्हावी यासाठी इंजि. देवेंद्र तायडे हे खूप आग्रही होते. देशपातळीवर गेल्या पाचवर्षात पुण्यानंतर पिंपरी चिंचवडला आलेले महत्त्व कायमच लक्षवेधी ठरले गेले आहे. उद्योग, मोठ-मोठे कारखाने, शैक्षणिक संस्था, सक्षम महापालिका, आयटी इंडस्ट्री, मेट्रोच्या जाळ्याची सुरुवात यामुळे पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र अस्तित्व ठसठसितपणे जगासमोर आले आहे.
या सभेसाठी ८० फूट बाय ४० फूट इतका मोठा स्टेज उभारला गेला आहे. साऊंडसिस्टिम, लाईट, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी ओबीव्हॅनची व्यवस्था, निमंत्रित व्यक्तींसाठी २ हजार खुर्च्या, तसेच इतरांसाठी बसण्यास भव्य लाल रंगाची मॅट अंथरण्यात आली आहे. सोशल मिडियातील फेसबूक, सॅटेलाईट यंत्रणा, तसेच छोटी-मोठी व्हिडिओ न्यूज चॅनेल यांना थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त या सभेसाठी ठेवला आहे. पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली टीम आखण्यात आली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सोमवारी सकाळी अकरा वाजता चिंचवड येथे आगमन होणार असून एमआयडीसीच्या विश्रामगृहात ते उतरणार आहेत. मात्र एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार बळीराम शिरमकर, अंजली आंबेडकर, माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने उपस्थित राहणार आहेत.
इंजि. देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली महासचिव सुहास देशमुख, के.एम. कांबळे, सेक्रेटरी रवी शिंदे, संघटक जगन्नाथ कांबळे, महिला आघाडी प्रमख लता रोकडे, रमाई महिला मंचच्या अध्यक्षा भिमाताई तुळवे व शेकडो कार्यकर्ते या सभेच्या संयोजनसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून झटत आहेत.