वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत येथील सई विनोद मोहिते या शाळकरी मुलीने नुकतेच आपल्या वाढदिवसानिमित्त ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ही घटना घडली.सईचा १४ वा वाढदिवस होता.आहे. सोबत पेढे ही देत तिने ही थाळी खाण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे तोंड गोड केले.
येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हॉटेल पंगत मध्ये शिवभोजन थाळी मिळते.येथे दररोज गरजू नागरिक शिवभोजन थाळीचे पार्सल घेण्यासाठी येत असतात. यात अनेक जण अत्यंत गरीब असतात.त्याच्याकडे जेवण घेण्यासाठी अवघे पाच रुपयेही नसतात. ही गरज ओळखत मोहिते कुटुंबाने सईच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ४०० जणांच्या थाळीचे पैसे जमा केले .
यावेळी सई म्हणाली,” वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून तो गरजूंसाठी करावा असे वाटत होते. हातांवर पोट असणारे, भीक मागून खाणारे, पारधी व भटकंती करणाऱ्या लोकांकडे अवघे पाच रुपये हे नसतात.हे कळाल्यावर मी शिवभोजन योजनेच्या माध्यमातून माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या खर्चातून ४०० थाळीचे पैसे जमा केले.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.हातावर पोट असणाऱ्या लोकांची मिळकत बंद झाली आहे. पर्यायाने जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते
किराणा माल उपलब्ध करुन देत आहेत. पण हे शिजवावे कसे हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळीचे महत्व वाढले आहे. मोहिते कुटुंबातील सई हिने वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. येथील मुक्तांगणच्या संचालक वर्षाराणी मोहिते यांची ती कन्या आहे.