संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेल्या दणदणीत आघाडीमुळे आज शहरात शिवसेनेच्या वतीने दुपारी एक वाजल्यापासून जल्लोषाला सुरूवात झाली.
पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी निकालाचा कल स्पष्ट होताच दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांसमवेत स्वत: फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र असलेले पार्थ पवार हे रिंगणात असल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर टिव्हीसमोर ठाण मांडून आमदार चाबुकस्वार बसले होते. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच त्यांना राज्यभरातून व विशेषत: मावळ मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून फोन येऊ लागले. सकाळी साडेअकराला तर निकालाचा कल एकदम स्पष्ट झाला. आणि जल्लोषाला एकच सुरूवात झाली. यासंदर्भात बातमी खासशी बोलताना आमदार चाबुकस्वार यांनी मावळमधील सर्व जनतेला धन्यवाद दिले.