ऐतिहासिक व पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून इतिहासात नोंद झालेल्या तळेगाव दाभाडे या गावचे मागील दिडशे वर्षातील लोकजीवन कसे चालायचे ? यावर संशोधन करून लिहिलेल्या ‘गावगाडा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी (ता. १५) होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. तळेगाव येथील वैशाली मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वा. या पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (सातारा) हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ‘दाभाडे घराण्याचा इतिहास’ या छोटेखानी दुसऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही पुस्तके ‘तळेगाव दाभाडे – इतिहास ते वर्तमान’ या मुख्य ग्रंथातही समाविष्ट करण्यात आली आहेत.
तळेगावला असलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक तसेच सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना तळेगाव दाभाडेवर ग्रंथ काढण्याची कल्पना तीन वर्षांपूर्वी सुचली. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, प्रा. जयंत जोर्वेकर, प्रमोद बोराडे यांनी एकत्र येऊन या भव्य ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात केली.
या निमित्ताने तळेगाव दाभाडेचे रुप समग्र इतिहासाद्वारे ग्रंथरुपाने आता जिवंत होत आहे. ‘तळेगाव दाभाडे-इतिहास ते वर्तमान’ हा मुख्य ग्रंथ ६०० पानी असून एकूण १० भागात या ग्रंथाची विभागणी आहे. ‘गावगाडा’ तसेच ‘दाभाडे घराण्याचा इतिहास’ या भागांचाही मुख्य ग्रंथात समावेश आहे. शिवाय हे दोन्ही भाग स्वतंत्ररित्या पुस्तकातही उपलब्ध असणार आहेत.
लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी ‘गावगाडा’मध्ये ५१ जातींची संशोधनपर माहिती संकलित करत बारा बलुतेदार, अलुतेदार, फिरस्ते, शुद्राति-शुद्र अशा सर्वच जात-धर्म पंथ यांचा इतिहास तत्कालीन कार्य व त्यांच्या सामाजिक स्थित्यंतराचा अभ्यास या पुस्तकात मांडला आहे.