चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या समर्थकांमध्ये काल (गुरूवार) पासून सोशल मिडियावर निराळेच युद्ध पेटले आहे. या दोन्ही पक्षातील युवा राजपूत्रांबरोबरील देखण्या पोरींचे फोटो व्हायरल झाल्याने समर्थन करण्याबरोबरच तुटून पडण्यावरही नेटकऱ्यांनी कुठलीच कसूर ठेवली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
येत्या सोमवारी (ता. २९) मावळ, शिरूरसह राज्यातील लोकसभा निवडणूकींचा चौथ्या व अंतिम टप्प्यासाठी मतदान होत आहे. जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा खासगी फोटो, तसेच कंबरेखाली वार करणारे फोटो व माहिती प्रसिद्ध होणे ही बाब निवडणूकांसाठी काही नवीन नाही.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा व उत्सुकतेचा बनला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा शिवसेनेतर्फे उभे आहेत.
कालपासून सोशल मिडियावर पार्थ पवार यांचे पबमधील डान्सचे व पोरींबरेाबरील फोटो व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचेही देखण्या पोरींचे फोटो प्रतिउत्तर म्हणून सोडण्यात आले. राष्ट्रवादीचे समर्थक मते मांडताना ‘आमचा उमेदवार तरूण आहे, यंग आहे तो पबमध्ये जाणार नाही तर काय टपरीवर जाणार का?’ असा सवाल करून समर्थन करत होते. तर आदित्य समर्थक नेटकरी ‘मैत्रीणीबरोबर फोटो काढणे व फिरणे चुकीचे आहे का?’ अशी उत्तरे देत होते.
एकूणच सोशल मिडियात दोन्ही पक्षांची दातखिळी बसणारे फोटो व्हायरल झाल्याने एकमेकांची उणी-धुणी काढण्यासाठी नेटकऱ्यांची एकमेकांवर चाललेली तूफान फटकेबाजी आज दिवसभर सुरू होती.