पिंपरी चिंचवड शहरात कार्यकर्त्यांपुरतीच काँग्रेस उरलेली, त्यातही दोन गटांमधून विस्तव जात नसल्याची स्थिती… यामुळे एकाच भागात वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये मिटिंगा घेऊन दोन्ही गटांचे समाधान करताना राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांना काल (मंगळवारी) कसरत करावी लागली.
पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचे दोन गट कार्यरत आहे. सक्रीय म्हणून एक गट ओळखला जातो तर दुसरा गट विद्यमान अध्यक्ष सचिन साठे यांचा म्हणून ओळखला जातो. शहर एकच असले तरी मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शहर विभागले गेले आहे. मागील महिन्यात पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन साठे यांची घरी जाऊन घेतलेली भेट पाहून सक्रीय गटाने ‘आमच्याबरोबर पण बैठक घ्या’ असे म्हणत पवार यांना जेरीस आणले होते. अखेर पवारांनीही त्यांच्याबरोबर बैठक घेतली होती.
काल पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार विलास लांडे सांभाळत आहे. काल (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता लांडे यांनी सक्रीय गटाबरोबर पहिली बैठक हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे घेतली. याची कुणकुण दुसऱ्या गटाला लागल्याने त्यांनीही बैठकीचा आग्रह धरून आपले महत्त्व दाखविले, अखेर कोणाचीच नाराजी नको म्हणून लांडे यांनी त्या गटाचीही बैठक एक वाजता बर्ड व्हॅली या हॉटेलात घेतली. या दोन्ही हॉटेलांमधील अंतर काही फूटांचे आहे. मात्र या दोन गटांमधील मने दुभंगल्याने निर्माण झालेले अंतर कित्येक मैलाचे असल्याची स्थिती आहे. रिंग मास्टर असलेले लांडे यांची मास्तरकी मात्र दोन्ही गटांना समाधान देऊन गेली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, इंदापूर, तसेच पुणे शहरात काँग्रेसच्या गट-तटांचे ‘मोदी हटाव’ या एकाच भूमिकेसाठी मिलन झाले असले तरी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस मात्र त्यास अपवाद ठरले आहे.