पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. गेली दहा वर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले जगताप व बारणे यांनी झाले गेले विसरून जात मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी एकमेकांना अखेर मिठी मारली. ‘चिंचवडमधून बारणेंना मोठे लीड मिळवून देणार’ अशी जाहीर घोषणा आमदार लक्ष्मण जगताप यांनी यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत केल्याने उपस्थित पत्रकारांना ‘मेरी जीत तेरी जीत’ या शोलेमधील गाण्याची आठवण झाली.
मावळ कोणाचा? यावरून भाजपने गेले चार महिन्यांपासून सुरू केलेली विविध प्रकारची षडयंत्रे, चाली, गनिमी कावा, व छुप्या कारवायांना अखेर तिलांजली मिळाली आहे.
खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मनोमिलनाच्या आजच्या पत्रकार परिषदेत सर्वप्रथम बारणे यांनी ‘भाजपवर व आमदार जगताप यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेत असल्याचे सांगत दोन पाऊले मागे जात असल्याचे स्पष्ट केले.
तर आमदार जगताप यांनी, आपली चूक आहे का? हे तपासले तर प्रश्न सुटले जातात मात्र दुसऱ्याची चूक आहे असे म्हटले तर प्रश्न वाढत जातात असे नमूद करत आमच्यात मतभेद होते परंतू मनभेद नव्हते. देशहितासाठी मी बारणेंना साथ देणार असून चिंचवड मतदारसंघातून लीड मिळवून देणार अशी घोषणा यांनी यावेळी केली.
दरम्यान, दोघांच्या या मनोमिलनात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून काल रात्री पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जगतापांची भेट घ्यायला त्यांच्या घरी पाठवले होते. या वेळी खासदार बारणे यांनाही पाचारण करण्यात आले होते. अखेर समेट घडून त्याचे रूपांतर आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. शिवसेनेच्या मावळ व शिरूर मधील दोन्ही खासदारांना भाजपपुढे झुकवण्यात आमदार जगताप व लांडगे यांना यश आल्याचे आता बोलण्यात येत आहे. शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनीही हा वाद मिटवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती याबद्दल आमदार जगताप यांनी त्यांचे आभार मानले.