एका सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास ते दोघे एका पाठोपाठ आले आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता भेट होणार? चर्चा होणार? अशी उपस्थित सर्वांनी अटकळ बांधली खरी मात्र अवघ्या ५० फुटांवर असूनही ते एकमेकांसमोर येऊ शकले नाही. अचानक का होईना, युतीची गुढी उभारली जाईल अशी अपेक्षा असणाऱ्यांचा अखेर हिरमोड झाला.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे ते दोघे होत. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी या स्नेहमेळाव्याला लाभली होती. रात्री आठच्या सुमारास आमदार जगताप यांचे या ठिकाणी आगमन झाले. सर्वांच्या अभिवादनाचा स्विकार करत नंतर ते प्रेक्षागृहाच्या मागील बाजूस असलेल्या व्हीआयपी कक्षात अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत गप्पा मारत बसले. तत्पूर्वी आलेले खासदार अमर साबळे माजी आमदार अण्णा बनसोडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे हे देखील या गप्पांमध्ये सहभागी झाले. तोच काही मिनिटांत खासदार श्रीरंग बारणे हे या ठिकाणी उभारलेल्या स्टेज जवळ आले. राजकीय दुष्मनी असलेले हे दोघे आता योगायोगाने भेटू शकतात, असा सर्वांना अंदाज आला. सुमारे आठ ते दहा मिनिटे थांबून श्री. बारणे हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व उपस्थित सर्वांना भेटले व निघून गेले. मात्र ५० फुटांवर असलेले जगताप व बारणे एकमेकांना भेटू न शकल्याने युतीची मजबूत गुढी उभारली जाईल या अपेक्षेत असलेल्यांचा अपेक्षाभंग झाला.
मावळ लोकसभेच्या सध्या गाजत असलेल्या रणकंदनाकडे आता संपून महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील कटुता मात्र संपायची काही चिन्हे नाहीत. येत्या ९ तारखेला श्री बारणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अर्ज भरायला येण्यासाठी आपण जगतापांना विनंती करू, असे त्यांनी अगोदरच एका वृतपत्रात म्हटल्याचे छापून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्वांचे लक्ष ९ तारखेला या दोघांचे मनोमिलन होणार का ? याकडे लागले आहे.