विजय जगताप
अजित पवार आणि पार्थ पवार या पिता-पूत्रामध्ये एका गोष्टीमध्ये मात्र कमालीचे साम्य आढळत आहे. राजकीय पटलावर दोघांची पडलेली एन्ट्री ही खासदारकीच्या निवडणूकीपासून राजकीय करिअरचा प्रारंभ करणारी ठरली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून १९९१ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार हे नाव सर्वप्रथम पिंपरी चिंचवडकरांना माहिती झाले. तेव्हा पिंपरी चिंचवड हा भाग बारामती मतदारसंघात मोडत होता. वयाच्या ३२व्या वर्षी अजित पवार यांची पडलेली ही एन्ट्री ही तत्कालीन शहराच्या काँग्रेसच्या राजकीय मंडळींना ‘पवार साहेबांचा पुतण्या’ अशाच स्वरूपाची भासत होती. ही लोकसभा लढण्यापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक तसेच १९८२ मध्ये माळेगाव साखर कारखान्यावर संचालक असणे एवढीच काय ती अजित पवार यांची ओळख होती. परंतू आपला आता राजकीय वारसदार ‘अजित’ आहे हे शरद पवारांनी दाखवून देण्यासाठी लोकसभेचा रस्ता अजित पवारांसाठी सर्वप्रथम तयार केला होता. तेव्हा शरद पवारांचे वय ५१ इतके होते.
आता अजित पवार यांनी आपल्या वयाच्या ५९ व्या वर्षी आपला पुत्र पार्थ यास लाँच करण्यासाठी लोकसभेच्याच रस्त्याची निवड केली असून पार्थचे वय आता २९ इतके आहे.
एन्ट्री तरी पिता-पूत्राची सेम जुळत असली तरी १९९१ मध्ये असलेल्या अखंड काँग्रेसमध्ये शरद पवार या नावाची असलेली ताकद व गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतची वाट सुकर होण्यासाठी असलेले रेड कार्पेट जे अजित पवार यांना सहज उपलब्ध झाले. ती परिस्थिती मात्र पार्थ यांच्या वाटयाला नाही हा मुख्य फरक आहे. जिवाचं रान करून पार्थ यांना जिंकण्यासाठी पवारांसह सर्व राष्ट्रवादीला आता प्रयत्न करावे लागणार आहेत.
पुणे जिल्हा परिषद वगळता जिल्हयात, राज्यात, केंद्रात कुठेच आज राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नाही ही वस्तुस्थिती आहे. अजित पवार या नावाचा वृक्ष वाढण्यासाठी जे पोषक वातावरण, खत-पाणी, स्वातंत्र्य उपलब्ध होते तशी स्थिती मात्र पार्थ यांच्या वाटयाला नाही हा मुख्य फरक आहे.