पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३७ वा व सत्तारूढ भाजपचा तिसरा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर हे उद्या (सोमवारी) सकाळी सादर करणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करवाढ नसलेले व नागरिकांच्या सूचना स्विकारलेले हे बजेट ‘गुडीगुडी’ असण्याची शक्यता आहे.
मागच्या पानावरून पुढे ढकललेल्या गतवर्षीच्याच योजना व तरतुदींना नव्या अर्थसंकल्पात मुलामा देण्यात आला आहे. स्मार्टसिटी, अमृतयोजना, झोपडपट्टी पुनर्वसन, प्रधानमंत्री आवास योजना, पवना बंद जलवाहिनी, भामा आसखेड पाणीपुरवठा, नदी सुधार, स्वच्छ भारत या योजनांना मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ठळक स्थान मिळाले होते. यापैकी अनेक कामांच्या निविदा निघाल्यादेखील मात्र निविदेतील रिंग, भ्रष्टाचाराचे आरोप, वाढीव दराने दिलेली कामे या आरोपांनीही मागील वर्ष गाजले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे आता एकत्रित येऊन भाजपच्या चुकीच्या धोरणांना, कामांना व न सुटलेल्या प्रश्नांना हाणून पाडत असल्याची सद्यःस्थिती आहे.
भाजपची सत्ता २०१७ मध्ये आल्यानंतर तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ५ हजार १०० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये कुठलीही राजकीय छाप नव्हती. विशेष म्हणजे ८९५ कोटी ८९ लाख इतका शिल्लक निधीचा हा अर्थसंकल्प ठरला.
त्यानंतर भाजपचा दुसरा ५ हजार २३५ कोटींचा अर्थसकंल्प गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी २०१८ ला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शून्य तरतुदीला मज्जाव करण्यात आला होता. तसेच पालिका इतिहासात प्रथमच हे बजेट आयुक्तांनी सादर केलेल्या दिवशीच तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी मंजूर केल्याचा विक्रम घडला होता.
उद्या सादर होणाऱ्या बजेटमध्ये करवाढ होणार नाही हे अगोदरच आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना सांगून नागरिकांना दिलासा दिला आहे. उद्याच्या तिसऱ्या बजेटमध्ये काय असणार याची उत्कंठा विरोधी पक्षाच्या नेत्यांना व शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना लागली आहे. मागील दोन वर्षाच्या कारभाराचे पोस्टमार्टेम करण्याच्या तयारीत ही सगळी मंडळी लागली आहेत.