सोशल मीडियाच्या ताकदीचा प्रत्यय रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात अनुभवयास मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्लेक्स वरील फोटो चुकीच्या पद्धतीने छापून महाराजांच्या कार्य व उंचीचा अपमान अजाणतेपणी झाल्याचा प्रकार भाजपचे माजी नगरसेवक विलास मडेगिरी यांच्या चांगलाच अंगलट आला
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री मडेगिरी यांनी येत्या ५ ऑक्टोबर रोजी केले होते. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी त्यांनी आपल्या भागात लावलेल्या फ्लेक्समध्ये शिवाजी महाराजांचा फोटो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन माजी सरसंघचालकांच्या मध्ये छापला. पिंपरी-चिंचवड शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांना हा प्रकार कळताच त्यांनी फेसबुक व व्हाट्सॲपवर थेट मडेगिरी यांचा मोबाईल नंबर देऊन शिवप्रेमींनी जाब विचारावा असे आवाहन केले.शिवाय आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शाब्दिक धुलाई देखील केली. प्रचंड वेगाने व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे मडेगिरी यांची पळता भुई थोडी झाली. रातोरात तातडीने सर्व फ्लेक्स उतरवण्यात आले. तसेच आज त्यांनी ( सोमवारी) जाहीर माफी मागत अशी चूक भविष्यात होणार नाही अशी ग्वाही शिवप्रेमींना दिली.व पोलिस ठाण्यातही पत्र दिले.झालेली चूक ही प्रिंटींग मिस्टेक होती असे त्यांनी म्हटले.