( विजय जगताप)
पोलिस आयुक्तांना निवेदन देणे, फोटो काढणे, पुष्पगुच्छ देणे या गोष्टी तर दूरच.. साधी भेटही मिळणे मुश्कील असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज (२० एप्रिल)आपल्या शहरातील कारकिर्दीचे दोन महिने पूर्ण केले.
पोलीस आयुक्तालय तेच, स्टाफ तोच.. मात्र कामकाजाच्या पद्धती बदलल्याने पूर्वीच्या व आत्ताच्या आयुक्तांच्या स्वभावात एकदम ३६० डिग्री बदल झाल्याचे या शहरातील जनता अनुभवत आहे. २०एप्रिल २०२२रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. नेमके त्यादिवशी परदेशात असलेले तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश हे शहरात आल्यानंतर त्यांच्याकडून सूत्रे स्वीकारण्याची वाटही न पाहता अवघ्या सोळा तासात लगेचच श्री. शिंदे यांनी २१ एप्रिलला कामकाजाला सुरुवातही केली.
कृष्णप्रकाश यांची बदली अनपेक्षित व शहरातील बहुसंख्य राजकीय- सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना धक्का देणारी होती. प्रकाशझोतात राहणे म्हणजे काय असते ? हा प्रकार कृष्णप्रकाश यांनी आपल्या कारकीर्दीत दाखवून दिला. नागरिकांना थेट सहज भेट, फोटो काढण्यासाठी तात्काळ हाताची घडी(पोजसह) घालून तयार राहणे, निवेदन स्वीकारणे, पुष्पगुच्छ स्वीकारणे,
कोणाचाही वाढदिवस असो साहेब,” शुभेच्छा द्या.. आशीर्वाद द्या.. म्हटले की, क्षणात होकार …ही वैशिष्ट्ये होती कृष्णप्रकाश यांची… !
लोकांना यापूर्वी चौकीतील पीएसआय ला भेटणे मुश्कील व्हायचं असताना कृष्णप्रकाश यांच्या काळात थेट पोलिस आयुक्तांकडे आपले गाऱ्हाणे मांडता येऊ लागल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचे तर आयुक्तालय म्हणजे दुसरं घर झाले होतं. सोशल मीडिया व वृत्तपत्रात तर कृष्णप्रकाश यांना रेकॉर्डब्रेक प्रसिद्धी मिळाल्याचा इतिहास आहे.
अशा स्थितीत अचानक त्यांची झालेली बदली (अशा ठिकाणी की जिथे त्यांनी यापूर्वी काम केले होते त्याच ठिकाणी )एका पत्राद्वारे त्यांच्यावर झालेले खंडणीचे आरोप, जमविलेल्या मायेची तक्रार, त्यात भर म्हणजे पिंपरीतील एका आजी व एका माजी आमदाराने त्यांच्या चौकशीची केलेली मागणी..यामुळे एव्हरेस्टवर चढलेला गिर्यारोहक अचानक जमिनीवर यावा अशी त्यांची अवस्था झाली.
“पुढच्याच ठेच मागचा शहाणा…”या म्हणीप्रमाणे त्यांच्या जागी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेल्या अंकुश शिंदे यांनी तर पूर्णपणे आपली कामकाज पद्धतच बदलून टाकली आहे. “नागरिकांनी थेट व्हाट्सअप द्वारे आपल्याकडे तक्रार करावी ,तसेच पोलीस खात्यातील कोणीही लाच स्वीकारली तर संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार “असे जनहिताचे निर्णय घेऊन त्यांनी नागरिकांना आपल्या कामकाजाची चुणूक दाखवली आहे.
कृष्णप्रकाश यांना परत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त नेमावे, अन्यथा रस्त्यावर येऊ, अमूक करू, तमूक करू, कोर्टात जाऊ अशा वल्गना करणाऱ्या शहरातील ५० सामाजिक संघटनांनी सुरुवातीस हंबरडा फोडला खरा, मात्र वाऱ्याची दिशा बदलल्याने त्यांनीही आता मूग गिळून गप्प राहणे आता पसंद केले आहे.