( विजय जगताप)
नवीनच असलेली महानगरपालिका, पहिलेच वर्ष, आणि अवघे ३० कोटी रूपये बजेट असलेल्या पिंपरी महापालिकेची विकासकामे करण्यासाठी ठेकेदारांना आम्ही अक्षरश: शोधायचो, विनवणी करायचो’ अशी आठवण महापालिका इतिहासातील पहिले स्थायी समिती अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांनी आज बातमी खासशी बोलताना व्यक्त केली.
तापकीर यांचा आज ७५ वा वाढदिवस. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता त्यांनी ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींचा पट उलगडून सांगितला.
१९८६ साली प्रथमच महापालिकेवर निवडून आलेल्या बाबासाहेब तापकीर यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी लाभली. महापालिकेला एकट्या जकातीतून ३२ ते ३३ कोटी रूपये उत्पन्न आदल्या वर्षी मिळाल्याने १९८६ -८७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३० कोटी रूपयांचे तयार करण्यात आले होते. तेव्हा प्रत्येक गाववाल्याला आपण निवडून आल्याचा व पुढारी झाल्याचाच इतका आनंद झाला होता की ठेकेदारी करणे,टेंडर भरणे व त्यातून पैसे कमावणे हा प्रकार प्रतिष्ठेला मान्यच नव्हता. शेती, दुधाचा धंदा आणि चाळींमधून मिळणारे भाडे यातच शहरातील सारे गाववाले खुश असायचे. ‘सुखवानी, लंके,मातेरे ही रोजगारासाठी छोटी मोठी कामे करणा-या तेव्हाच्या पोरांना आम्ही पकडून अरे ते टेंडर बिंडर काय असतं तेवढं भर, अर्ज रगड व काम कर ? असे म्हणायचो. आम्हाला नारळ फोडायला मिळतोय यातच आम्ही जाम खुश असायचो’अशा आठवणी तापकीर यांनी आज जागविल्या.