विजय जगताप
अवघ्या ६० दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या चिरंजीवाच्या लग्नाला उद्धव ठाकरेंसह अनेक व्हीव्हीआयपी मंडळी उद्या येथे येत आहेत. या लग्नसोहळ्याचे निमंत्रण हजारो जणांना धाडण्यात आले असल्याने संपूर्ण मावळ मतदारसंघ यानिमित्ताने ढवळून निघणार असल्याचे चित्र आहे.
खासदार बारणे यांच्या प्रताप या थोरल्या मुलाचे लग्न बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता होत आहे. हडपसर येथील नंदकुमार गुलाबराव घुले यांच्याशी बारणे घराण्याची सोयरीक यानिमित्ताने जोडली जाणार आहे.
या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या विशेष पाहुण्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आवर्जून उपस्थित राहत आहेत. राजकीय कार्यक्रम अथवा सभा सोडली तर श्री. ठाकरे प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात लग्नाच्या निमित्ताने येत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्या कुटुंबातील लग्नसोहळा वगळता पक्षाच्या खासदार पातळीवरील श्रेणीमध्ये मोडणाऱ्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे क्वचित गेल्याचा इतिहास आहे.
या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील येण्याचे कबूल केले असून मुख्यमंत्री येतीलच असे स्पष्ट संकेत अदयापपर्यंत हाती आलेले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही सध्याच्या राजकीय पटलावरील फार मोठी बातमी असणार आहे. शिवसेनेचे व अन्य पक्षांचे मिळून किमान २५ खासदार, राज्यमंत्रीमंडळातील सेनेचे कॅबिनेट मंत्री, अनेक आमदार, शिवसेना पक्षाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी, महापौर आदींची उपस्थिती उद्या असणार आहे. या लग्नाच्या पत्रिकाच सुमारे ५० हजार इतक्या छापण्यात आल्या आहेत. मावळ मतदारसंघातील प्रत्येक बॉटमलेवल वरील कार्यकर्त्यापर्यंत पत्रिका पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खासदार बारणे हे पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. सलग पाच वेळा त्यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कार असो की, मावळ मतदारसंघातील केलेल्या कामांचे पुस्तक तसेच ‘मी अनुभवलेली संसद’ असे आत्मकथनपर पुस्तक असो बारणे यांचे इव्हेंट कृतीदर्शक स्वरूपाचे ठरले गेले आहेत. दौंडचे सुभाष कुल घराणे, खेडचे नारायण पवार घराणे, प्रकाश म्हस्के घराणे, वाघेरे-पाटील घराणे अशा जिल्हयातील प्रसिद्ध घराण्यांशी नात्यागोत्यांनी बारणे घराण्याचा ऋणानुबंध जोडला गेलेला आहे.
यासंदर्भात बातमी खासशी बोलताना खासदार बारणे म्हणाले, ‘गेली ३८ वर्षे बारणे कुटुंबिय सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. नाती-गोती, कार्यकर्ते, जोडलेली माणसे असंख्य असल्याने त्यांना निमंत्रण देणे हे वरपिता म्हणून माझी जबाबदारी आहे. निवडणूका या कालबद्ध कार्यक्रम निश्चितीच्या असतात’. असे त्यांनी स्पष्ट केले.