विजय जगताप
पिंपरी महापालिकेने उभारलेले भोसरी येथील नवीन रूग्णालय वास्तविक दोन वर्षापूर्वीच दोन लांडगेंच्या शीतयुध्दामुळे चर्चेत आले. आता तर कोरोनामुळे हे संपूर्ण रूग्णालयच कोविड सेंटर झाल्याने तेथे अधिकच्या सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी पुन्हा एकदा दोन लांडगेंमध्येच आग्रही मागणी होऊ लागली आहे.
भाजपाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे व भाजपाचेच नगरसेवक रवी लांडगे यांच्यातील वितुष्टाला भोसरीतील हे नवीन रूग्णालय मध्यंतरी महत्त्वाचे कारण ठरले होते.भोसरीतील हे रूग्णालय पालिकेच्या वैभवात मानाचे पान ठरले असून कोविड सेंटरमध्ये या रूग्णालयाचे रूपांतर झाल्यानंतर तर येथे उपचारासाठी दाखल होण्यासाठी रूग्णांची पसंती पहिल्या क्रमाकांची आहे.
दिड महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक असलेल्या रवी लांडगेंना संधी मिळू शकली नाही.त्याचा रोष त्यांनी आमदार लांडगे यांच्यावर जाहीररित्या व्यक्त केला होता.
मागील महिन्यात २० मार्चला रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन भोसरीतील नवीन रुग्णालयात ‘आयसीयू युनिट सुरू करावे ‘अशी आग्रहाची मागणी केली.तसेच हे रूग्णालय पूर्ण सुविधायुक्त न होण्यामागे काही मंडळींचा डाव होता असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.शहरातील एकूण एक मिडियाने रवी लांडगे यांच्या मागणीला प्रचंड उचलून धरल्याचे तेव्हा दिसून आले होते.
दरम्यान, कालच(२२ एप्रिल )महापालिकेच्या भांडार विभागाने या रूग्णालयात आयसीयू युनिट सुरू करण्यासाठी निविदा प्रसिध्द केली असून रवी लांडगे यांच्या मागणीला त्वरीत यश मिेळाल्याची ही पावती समजली जात आहे. तर परवा(मंगळवार २० एप्रिल )रोजी आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिका-यांना पत्र देऊन आपल्या आमदार निधीतील १ कोटी रूपये खर्चून भोसरीतील या नवीन रूग्णालयात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावा अशी मागणी करून या रूगणालयाविषयीची आस्था स्पष्ट केली आहे.
भोसरीतील या नवीन रूगणालयाच्या विकासात व साधन सुविधेमध्ये अधिक भर पडावी यासाठी दोन लांडगेंमध्ये जरी सुप्त संघर्ष होत असला तरी भलं मात्र आता शहरातील जनतेचं होणार आहे.