अपक्ष म्हणून निवडणूक लढत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काॅग्रेसच्या नेत्यांचा जाहिरातीत वापर करत असल्याबद्दल पिंपरी चिंचवड येथील महिला उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने आज दिला.
पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरूण लाड हे आहेत. असे असतानाही पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या एका महिला उमेदवाराने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत वापरणे सुरू ठेवले आहे. मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याने याची गंभीर दखल राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज घेऊन हे प्रकार थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सदर महिलेस राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे छुपे समर्थन असल्याचे बोलले जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही परवा चिंचवडमधील प्रचार मेळाव्यात याविषयी लक्ष वेधले होते.