( विजय जगताप)
वाढदिवस साजरा करण्यात मशहूर असलेल्या आमदार महेशदादा लांडगे यांनी कोरोनामुळे आपण वाढदिवस करणार नसल्याचे आज जाहीर करून टाकले.
इंद्रायणी थडी,कुस्ती स्पर्धा,रिव्हर सायक्लोथाॅन, करिअर चॅलेंजिंग आदी मेगा इव्हेंट असो की स्वत:चा वाढदिवस दणक्यात साजरे करणे असो यात आमदार महेश लांडगे यांचा हात शहरात कोणी धरू शकत नाही.त्यांच्या लोकप्रियतेत व ते तरूणाईच्या गळ्यातील ताईत होण्यात दणकेबाज इव्हेंटचा वाटा कायम सिंहाचा ठरत आला आहे. यंदा मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन शहरवासियांना केले असून गरजूंना मदत करावी असे कळविले आहे.
२७ नोव्हेंबरला असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी एक दिड महिना अगोदरच त्यांच्या समर्थकांच्या अंगात वारे यायला सुरूवात होणे हा दरवर्षीचा प्रघात पडला होता.यंदा मात्र वाढदिवस होणार नसल्याने सर्वांनी महेशदादांच्या आवाहनाला साथ द्यायची ठरविले आहे.
नऊ महिन्यांपूर्वी शहर भाजप अध्यक्षपदाचे स्टिअरींग त्यांनी हातात घेतल्यापासून शहर भाजपमधील वाद अजून तरी सुरू झालेला नाही. नाही तर पक्षांतर्गत भांडणे असणे ही शहर भाजपच्या पाचवीला पुंजलेली बाब असायची.अध्यक्ष कोणीही होवो त्याच्या डोक्यावर मि-या वाटायला शहर भाजपमध्ये कायम स्पर्धाच झालेली आहे.महेश दादांच्या मागील नऊ महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मात्र भांडणासाठी फेमस असलेल्यांनी जुळवून घेतले आहे तर सदैव टिकेची संधी शोधत घरातील उंब-याच्या आतच तलवारबाजी करणा-यांनी आपल्या वाचेला कुलूप लावले आहे.