( विजय जगताप)
चाणाक्ष, हुशार,बुध्दिमान,सर आणि मास्टर माईंड अशा उपाध्या आणि पदव्या देऊन पिंपरी चिंचवडकरांनी उद्योजक कार्तिक लांडगे यांचा वाढदिवस नुकताच सोशल मिडियात दणक्यात साजरा केला.
परवाच ( १८ आॅक्टोबर)त्यांच्या वाढदिवसी ‘मास्टर माईंड’ या शब्द गुणविशेषणांनी सजवून सोशल मिडियाच्या भिंती रंगवत त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पहावयास मिळाले.भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे धाकटे बंधू असलेले कार्तिक लांडगे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मित्र मंडळींनी, नातेवाईकांनी त्यांच्या नावापुढे उपाधीसारखा ‘मास्टर माईंड ‘हा शब्द जोडल्याने त्यांना न ओळखणा-यांना देखील त्यांच्या या गुणाचा परिचय झाला.
इतिहासात जर डोकावून पाहिले तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक खंबीर वाॅल( भिंत) सांभाळणारी कोणीतरी व्यक्ती असतेच असते.आमदार महेश लांडगे यांच्या यश,किर्तीचे शिल्पकार म्हणून आज कार्तिक यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणासारख्या क्षेत्रात तर यशस्वी झालेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या विशिष्ट अंगभूत गुणांनी सर्वांथाने ओळखला जातो.
विद्यमान राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या यशामागे ‘भिडणं’ हा त्यांचा उपजत असलेला स्वभाव युएसपी म्हटला जातो तर सलग ११ वेळा सांगोल्यातून निवडून येणारे गणपतराव देशमुख यांचा ‘ साधेपणा’ हा त्यांचा युएसपी म्हटला जातो तर कार्यकर्त्यांचे विशेषत: तरूणाईचे असलेले विशेष प्रेम व गारूड हा महेश लांडगे यांच्या राजकारणातील युएसपी मानावा लागेल.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत देशाला झपाटून टाकणारी मोदी लाट सर्वत्र असतानाही पश्चिम महाराष्ट्रातून( भोसरी) अपक्ष निवडून आलेल्या महेश लांडगे यांना पहायला तेव्हा मंत्रालय,विधीमंडळातील सरकारी बाबू तसेच अन्य आमदार यांनाही डोळे भरून पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती ही वस्तुस्थिती आहे. या यशामागचा धागा बनलेले तसेच महेश लांडगे यांना दुस-यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी जी सूत्रबद्ध बांधणी करण्यात आली होती त्याचे शिल्पकार होते कार्तिक लांडगे.
पूर्वी राजकीय व्यक्तीच्या यशात व नावलौकिकात महत्तवपूर्ण कामगिरी बजावलेल्यास व जवळच्या खास माणसास “राईट हॅन्ड” म्हटले जायचे. लोकांची या उजव्या हातास आपल्या हातात पकडण्यासाठी धडपड चालायची.अलिकडे तर कोणीच राजकारणी उजवा हात निर्माण करण्याच्या फंदातच पडत नाही. वास्तविक भावाने भावाला साथ देणे, त्याच्या यशासाठी सर्वस्व ओतणे याचे दाखले पुराणकाळापासून ते सध्याच्या काळातही पहावयास मिळतात. गौतम बुध्द-आनंद, कृष्ण-बलराम,राम-लक्ष्मण, अमिताभ बच्चन-अजिताभ बच्चन,सचिन तेंडुलकर-अजित तेंडुलकर ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे…!
भारतच नव्हे तर जगभरात फिल्मी कलाकारांइतकेच राजकीय नेत्यांना महत्तव व स्थान आहे. राजकारणात उच्च स्थान वा व्याप वाढला की कामाचा डोंगर उपसण्याचे काम जवळच्या माणसाच्या खांदयावर येऊन पडते. आणि तो जर सख्खा भाऊच असेल तर विश्वासाबरोबरच सुस्कारा सोडण्याची हमखास गॅरंटी..! कार्तिक लांडगे हे तसे पाहिले तर इंजिनिअरींग झालेले व्यक्तिमत्व. राजकारणात नगरसेवक पदापासून सुरूवात केलेल्या महेश लांडगे यांचा आमदार होई पर्यंतच्या क्षणापर्यंत कार्तिक लांडगे हे तसे कोणाला परिचित व लोकप्रिय नव्हते परंतू लांडगे हे आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाचा व्याप वाढला आणि कार्तिक लांडगे यांच्या कक्षा वाढण्यास सुरूवात झाली.
नियोजन करणे, योजना आखणे, इव्हेंट ॲरेंज करणे, संकटातून मार्ग काढणे, याचबरोबर व्यूहरचना, धोबीपछाड डाव, कल्पकता, चातूर्य, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा, शत्रूला बेसावध ठेवणे,विश्वासू मंडळींची फौज उभारणे, हल्ला मग तो विचारांचा असो की नसो त्यास तयार राहणे त्यास तोंड देणे, वात लवंगी फटाक्याची लावायची परंतू सुरूंगाचे स्फोट होईल असा आवाज कसा काढायचा यामध्ये कार्तिक लांडगे यांचा हात आज कोणी धरू शकत नाही.
शत्रू व मित्र यातील फरक ओळखणारी पारखी नजर अनुभवाने त्यांनी कमावली आहे.त्यांच्या मास्टर माईंडच्या चक्रात अडकून मी मी म्हणणा-यांनी गुडघे टेकले आहेत.तितकेच काही दुरावले व दुखावले देखील गेलेले आहेत.मात्र राजकारणात हे चालतच असते. दिल, दोस्ती व दुनियादारीमध्ये हा माणूस तितकाच राजा व शिपाईही बनत आला आहे.
इतक्या सा-या गुणांचा संचय असलेले कार्तिक लांडगे म्हणूनच आज आमदार महेश लांडगे यांची भक्कम ‘वाॅल’बनून आज उभे आहेत. परंतू एक मात्र निश्चित की, लक्ष्मणाला महत्व व द्वितीय स्थान केवळ रामामुळेच आहे हे कार्तिक लांडगेही जाणतात. महेश लांडगे यांची राजकारणात गरूडझेप व भरारी नसती तर कार्तिक लांडगे यांच्या तल्लख बुध्दीचा परिघ फुलला नसता कारण पाॅलिटिक्स हे एकमेव असे क्षेत्र आहे की तिथे “आय क्यू” तेज रफ्तार होण्यासाठी मारलेल्या सिक्ससाठी बाऊंड्रीच नसते फक्त गोलंदाजी करणा-याचा बाॅल कसा येणार आहे हे अचूक ओळखता आलं की अनेक कार्तिक लांडगे तयार होऊ शकतात.