(विजय जगताप)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तब्बल २० वर्षानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत आज पाऊल टाकले. शहरातील वाढते कोरोना रूग्ण संख्येचे प्रमाण यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते थेट आयुक्तांशी चर्चा करण्यास आल्याने व त्यांच्या अतिसुक्ष्म प्रश्न विचारण्याच्या शैलीने प्रशासनही आदरयुक्त भितीने दबून गेल्याचे चित्र आज सायंकाळी पहावयास मिळाले.
वयाच्या ८० व्या वर्षी देखील कोरोना काळातही प्रवास करण्याचा त्यांचा झंझावाती दौरा मागील आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा सुरू करत मुंबईहून निघून आज थेट पिंपरीत ते आले.
राष्ट्रवादी काॅग्रेसच्या दत्ताकाका साने व जावेद शेख या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू तसेच शहरातील नागरिकांचा दैनंदिन मृत्यूदर दररोज दोन आकडी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट महापालिकेत येऊन माहिती घेतली. अचानक ठरलेल्या या दौ-यामुळे पोलीस व प्रशासनाची मात्र यावेळी धांदल उडाली.
९ सप्टेंबर २००० रोजी टाटा मोटर्सच्या इंडिका गाडीच्या जकात विषयक सवलत प्रश्नी शरद पवार थेट महापालिकेत आले होते. तत्कालीन महापौर मधुकर पवळे व आयुक्त भा.ई. नगराळे यांच्याशी त्यांनी बैठक घेतली होती.
त्यानंतर थेट आज ४ सप्टेंबर २०२० ला कोरोनाची माहिती घेण्यासाठी ते पालिकेत आले.
टेस्टींग किती जणांचे करता? एवढे कमी टेस्टींग का करता? शहरातून येताना मास्क न लावलेले नागरिक मला जास्त दिसले? जनजागृती करता का? ती कशा प्रकारे ? कंन्टेन्मेंट झोन किती? तेथे काय दक्षता घेता? मृत्यूचे प्रमाण का वाढते? आॅक्सिजन, व्हेंटीलेटर ची उपलब्धता किती? डाॅक्टर किती? त्यांच्या डयूटीचे प्रमाण कसे? आदी प्रश्न शरद पवार विचारत होते व आयुक्त त्यांना उत्तर देत होते.राष्टवादीचे आमदार अण्णा बनसोडे मुंबईत असल्याने शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके,नगरसेवक श्याम लांडे, योगेश बहल, सुलक्षणा शिलवंत, वैशाली घोडेकर , डब्बू आसवानी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी रेमीडिसीवर या ५० इंजेक्शनचा बाँक्स आयुक्तांकडे सुपूर्द केला. उशीर झाल्याने ॲटो क्लस्टर, व अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरला त्यांना भेट देता आली नाही.