( विजय जगताप)
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा रोजचा मीटर तीन आकडी संख्येतच गेल्या काही दिवसांपासून कायम असून रोजचाच हजार रूग्ण संख्येला टेकणारा आलेख तसेच काल( गुरूवारी ) ४१ जणांचा झालेला मृत्यू पाहता पालिका प्रशासनापुढे चिंता व तणावाचे वातावरण वाढल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.
शहरात कोरोनाचे पहिले तीन रूग्ण ११ मार्चला सापडले.एका नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या पार्टीसाठी हे तिघे फुकैत( थायलंड)ला गेले होते.मग जो रूग्णसंख्येचा मीटर सुरू झाला आहे तो काही अदयापपर्यंत थांबलेला नाही. एप्रिलमध्ये तबलिगीला ( दिल्ली) जाऊन आलेल्यांमुळे मग शहराच्या चारही कोप-यात रूग्ण संख्या वाढू लागली. आणि १२ एप्रिलला एका ४५ वर्षीय पुरूष रूग्णाचा कोरोनामुळे शहरात झालेला पहिला मृत्यू नोंद झाला.राज्यात जेव्हा कोरोनाचा पार्दुर्भाव सुरू झाला तेव्हा महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड हे नाव प्रथम क्रमांकावर होते नंतर पुढे पुढे राज्यातील एकही जिल्हा व तालुका कोरोनाने सोडला नाही.
सद्यस्थितीत एकूण रूग्ण संख्या पाहता मृत्यूदर कमी राखण्यात पिंपरी चिंचवडने यश मिळविले असले तरी ४० हजाराला येत्या दोन दिवसात टेकणारी रूग्ण संख्या सप्टेंबरच्या मध्यात कमी कमी होत जाईल असा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बातमी खासशी बोलताना व्यक्त केला .