कोरोना रूग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर प्लाझमाच्या उपचारानंतर यश आल्याचे सिध्द झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी प्लाझमा दान करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष झटून कामाला लागले आहेत.
शहर शिवसेनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्लाझमा दान अभियान कालपासून( ता.२७)सुरू केले.तर सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी महापालिकेकडून कोविड होऊन बरे झालेल्या रूग्णांची यादी न मिळाल्यामुळे स्वत: रूग्णांचा शोध घेऊन त्यांना ते वायसीएम रूग्णालयात प्लाझमा दान करायला घेऊन येत आहे.मागील चार दिवसात श्री गायके यांनी चार जणांना प्लाझमा देण्यासाठी प्रवृत्त केले.
भाजप नेते अमित गोरखे, युवा सेनेचे निलेश हाके, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही नागरिकांना आवाहन करण्यास सुरूवात केली असल्याचे शहरात समाधानकारक चित्र आहे. राष्ट्रवादी काॅगरेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या आई कल्पना शिलवंत यांनीही प्लाझमा दान करत असल्याचे सोशल मिडियाद्वारे जाहीर केले आहे. शहरातील प्रसिद्ध व्याख्यात्या, प्रवचनकार शारदाताई मुंढे यांनी आॅनलाईन तसेच शक्य तेथे प्रत्यक्ष जाऊन मानसिकरित्या खचलेल्या कुटूंबांना समुपदेशन करण्यास सुरूवात केली आहे.