( विजय जगताप)
आपली सत्ता असूनही आयुक्त कामे करीत नाही अशी नाराजी सत्ताधारी आमदार करत असतानाच आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहराचे प्रश्न सुटले जाऊ लागल्याने शहर भाजपच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
पिंपरी महापालिकेशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष असणे व पाठोपाठ पार्थ पवार यांनीही शहरातील प्रश्नांचा मागोवा घेण्यास सुरूवात केल्याने सत्ताधारी भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना दिलेले प्राधान्य यामुळे आधीच शहर भाजपचे नेते नाराज आहेत. या पार्श्व भूमीवर नुकतेच ठेकेदारांची थकीत बिले देण्यासाठी अजित पवार यांनी केलेल्या मध्यस्थीचे ढोल नुकतेच शहर राष्ट्रवादीने वाजविले. तर काल पार्थ पवार यांनी आयुक्तांची भेट घेऊन कोरोना प्रश्नी चर्चा केली व प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रश्नी मार्ग काढण्याची शिफारस केली.
सत्ता आमची असूनही प्रलंबित निर्णय व प्रश्नांची सोडवणूक राष्ट्रवादी करू लागल्याने शहर भाजप आता धड विरोधातही जाऊ शकत नाही आणि आयुक्तांनी कोणाला भेटावे वा भेटू नये यासाठी अडवूही शकत नाही अशा कैचीत अडकली आहे.
संयम व आखणी करून राष्ट्रवादीची सुरू असलेली चाल पुढे अनेक राजकीय वळणे ते घेणार हे निश्चित सांगून जात आहे.दिड वर्षावर पालिकेची निवडणूक आली आहे यामुळे पार्थच्या नेतृत्वाचा खुंटा शहरात आता मजबूत करण्यासाठी अजित पवार मागील लोकसभा पराभवाचं उट्टं नक्की वसूल करणार , असा राजकीय निरींक्षकांचा अंदाज आहे. पार्थ पवार यांचा बदललेला ड्रेसिंग सेन्स व अभ्यासपूर्ण प्रश्न मांडण्याची स्टाईल व स्थानिक राष्ट्रवादीच्या पुढा-यांना महत्त्व न देता वैयक्तिक भेट घेऊन रचलेली चाल बरंच काही सांगून जात आहे.