(विजय जगताप)
अवघ्या दिड वर्षावर आलेल्या पिंपरी महापालिकेच्या निवडणूका व शहरातील दोन भाजप आमदारांना टक्कर देण्याची क्षमता असलेल्या विलास लांडे यांना राज्यपालनियुक्त आमदारकी देण्याची मागणी भोसरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी काल शुक्रवारी ( १२ जून) पुण्यात उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
पुण्यातील विधान भवनात या मंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. येत्या काही दिवसात राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यापैकी एका जागेवर माजी आमदार विलास लांडे यांची नियुक्ती पक्षाने करावी या मागणीने जोर धरला आहे.
२०१४ व २०१९ या विधानसभा निवडणूकीत सलग दोनदा त्यांना महेश लांडगे यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आहे. महापालिकेला पुन्हा राष्ट्रवादीच्या सत्तेचे वैभव मिळण्यासाठी विलास लांडे यांना आमदार म्हणून ताकद मिळण्याची गरज असून सध्याचे भोसरीचे आमदार हे भाजपचे शहराध्यक्ष देखील असल्याने त्यांना शह देण्यासाठी लांडे यांना बळ देण्याची हिच योग्य वेळ असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, दत्ताकाका साने, विनायक रणसुंभे आदींसह भोसरीतील सर्व नगरसेवकांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे.