( विजय जगताप)
‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशा अर्थाची एक म्हण आहे. कोल्हापूरच्या एका पुढा-याबरोबर सोनाली कुलकर्णी लग्न करणार ?अशी अफवा मागील आठवड्यात सुरू झाली. सेलिब्रिटींबाबत अफवा नेहमी उठतच असतात. एखादा उद्योगपती, क्रिकेट स्टार बरोबर नाव जोडल्याची अफवा खोटी असली तरी सुखावणारीही असते.परंतू ..’हे काय ,नवंच …राजकीय पुढा-याबरोबर अफवेचं झेंगाट..?’असे म्हणत सोनालीने अखेर काल तडकाफडकी आपल्या नवरोबाचे नाव व साखरपुडा झाल्याचे जाहीर करून सुस्कारा सोडला.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ग्लॅमर अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्राधिकरण भागात ती राहात असून या शहराशी असलेले तिचे प्रेम व नागरी कर्तव्य याबाबत ती सदैव अग्रेसर व दक्ष असल्याचे सिध्द झाले आहे.
नटरंग पिक्चरमुळे रातोरात स्टार झालेली सोनाली १६ वर्ष या इंडस्टरीत टिकून राहिली असून आजही तितकीच तिला डिमांड आहे.
सोशल मिडियावर कायम ॲक्टीव्ह असलेल्या सोनालीने फेब्रुवारी महिन्यात दुबईत एका मराठी चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या तरूणाबरोबर साखरपुडा केला. दुस-या दिवशी मंगळसूत्र घातलेला फोटो व नियोजित नव-याबरोबर ॲडव्हेंचर करतानाचे फोटो टाकत आपण विवाह बंधनात बांधले गेल्याचे तिने सोशल मिडियावर म्हटले. फेब्रुवारीत हि पोस्ट टाकताना तिने नव-याचे नाव व फोटो मात्र फ्रंटला येणार नाही याची काळजी घेतली.
परंतू वास आला तरी हुंगायला तयार असलेले बहाद्दर आपल्याकडे काही कमी नाहीत.राजकीय आखाडयात नडणं आणि भिडणं यासाठी फेमस असलेल्या कोल्हापूरमधील राजकीय वैर असलेल्या दोन गटातील एकाने आपल्या विरोधकाची बदनामी करण्यासाठी सोनालीचा भारी नवरा कोल्हापुरमधील अमूक अमूक पुढारी असल्याची पुडी सोडली आणि बघता बघता या अफवेने जोर धरला. अखेर परवाच्या शनिवारी मिडियासमोर येत ही अफवा असल्याचे सोनालीने सांगितले. मग …सोनालीने जाहीर केलेला तो कोण? हे नवंच झेंगाट मागे लागेल हे ओळखून अखेर सोनालीने काल ( सोमवारी) तिच्या वाढदिवसाच्या दिवशी नव-याचे नाव व फोटो जाहीरपणे दाखवून राजकारण्यांच्या तावडीतून अफवेची मान सोडवून घेतली.