( विजय जगताप)
१९ जून १९६६ साली स्थापना झालेल्या शिवसेनेचा संघटना ते राजकीय पक्ष असा प्रवास सुरू असताना ठाकरे हे नाव कायम निवडणूक लढविण्यापासून लांब होते.परंतू काळाच्या ओघात अखेर ५२ वर्षानंतर ठाकरे घराण्यातील पिता-पुत्रानेच साडेपाच महिन्यांच्या फरकाने संसदीय राजकारणात पाऊल टाकत काळ सतत बदलत असल्याचे दाखवून दिले आहे.
काल उध्दव ठाकरे हे आमदार म्हणून अधिकृतरित्या जाहीर झाल्याने मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या घटनात्मक वैधतेचा प्रश्न सुटला.आॅक्टोबर २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवून ठाकरे घराण्यातील पहिले निवडून आलेले नाव म्हणून नोंद केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री झालेले उध्दव ठाकरे यांच्या मात्र संसदीय राजकारणातील वैधतेला आमदार होणे ही अट असल्याने काल तीदेखील पूर्ण झाली. संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला होता व आयुष्यभर स्वत: निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मात्र त्या भूमिकेशी मरेपर्यंत एकनिष्ठ राहिले होते.
पुढे उध्दव ठाकरे देखील तोच कित्ता गिरवणार असल्याचे जवळपास सिध्दही होत चालले होते. मात्र २०१४ ला सर्वप्रथम आडपडदयाने ‘उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत हे महाराष्ट्राचे स्वप्न आहे ‘असा षटकार खासदार संजय राऊत यांनी मारला .अप्रत्यक्षरित्या ठाकरे घराणे सत्तेच्या सिंहासनावर बसण्यास आतूर असल्याचे मनसूबे स्पष्ट झाले खरे परंतू राऊंतांचे हे बोल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दरबारातील स्तुतीपाठकासारखे भासले.
२०१४ ला सेनेने भाजप सत्तेत सहभाग घेतला होता खरा व तेव्हा देखील उध्दव ठाकरे मंत्री म्हणून सहज सहभागीही होऊ शकले असते परंतू ती मजा वलयांकित नाव असलेल्या ठाकरे घराण्याला शोभली नसती..! २०१९ ला मात्र संधी जुळून आली ( जुळवली गेली)आणि थेट मुख्यमंत्री होण्याचे उध्दव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले. भाजपला मात्र ठाकरे यांच्या या स्वप्नाच्या दिशेच्या शोधाचा उलगडा झाला नाही हे विशेष म्हणावे लागेल.
शिवसेनेच्या जन्मानंतर ३० आॅक्टोबर १९६६ च्या दसरा मेळाव्यात “ राजकारण हे गजकर्णासारखे असते” असे भाषण बाळासाहेबांनी करून शिवसेना राजकारणात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.
परंतू अवघ्या १० महिन्यातच १९६७ च्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या राजकारण प्रवेशाचा श्री गणेशा झाला . आणि पुढे ५२ वर्षानंतर प्रेमात , राजकारणात व युध्दात सारे काही माफ असते हे ठाकरे घराण्याने सिध्द करून दाखविले.