(विजय जगताप)
प्रशासकीय अधिका-यांची खासियत म्हणजे ही मंडळी एखादे चांगले काम कोणी केले तर ते एकमेकांचे कौतूकही करत नाही. परंतू राजस्थानमधील या दोन आयएएस अधिका-यांनी भिलवाडयातून कोरोनाला घालविले आणि आनंदाच्या भरात एकमेकांना मिठी मारली.
आज संपूर्ण देशातील राज्ये भिलवाडयाचे माॅडेल राबविण्याच्या प्रयत्नात आहेत. लाॅकडाऊनची तारीख संपली तर पुढे काय करायचे? हा पंतप्रधान मोदींपुढे असलेला प्रश्नही भिलवाडयाने चुटकीसरशी सोडविला आहे.
राजस्थान सरकारचे मुख्य आरोग्य सचिव रोहित सिंग आणि भिलवाडयाचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट ( जय आणि विरू )या दोन आयएएस अधिका-यांनी नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण या तिसुत्रीचा मार्ग स्विकारल्यास समस्या मुळापासून उखडून टाकता येते हे दाखवून दिले आहे.जेव्हा सारा देश २४ मार्चपासून लाॅकडाऊन करण्यात आला त्याच्याही अगोदर १८ मार्चलाच या जोडीने भिलवाडा या जिल्हयात कोरोनाचे रूग्ण सापडले म्हणून सगळा जिल्हाच कुलूपबंद केला. आणि मग शास्त्रीय दृष्टीकोनातून या दोघांनी पुकारले कोरोनाविरूध्द युध्द..!
चिटपाखरू देखील जिल्ह्याच्या आत जाणार नाही आणि बाहेरही येणार नाही अशी काळजी घेत एकूण एक घर तपासणीसाठी पथके रवाना केली. सर्दी आणि खोकला हा तसा जगाच्या पाचवीला पुंजलेला साधा आजार..! आख्ख्या जिल्हयात जेवढयांना सर्दी -खोकला झालाय त्यांची यादी बनविली, त्यांची वर्गवारी बनविली. गार खाल्ल्याने अथवा घरातून कोणाला तरी झाल्याने त्यालाही सर्दी -खोकला होतोय अशांना वेगळे केले , ज्यांची लक्षणे साधारण सर्दी -खोकल्यासारखी नाही , शंकास्पद वाटतात अशांचे विलगीकरण केले.आरोग्य पथके जिल्हयातील या दोन्ही वर्गवारी केलेल्यांकडे लक्ष देऊनच होती. जे पाॅझिटिव्ह सापडले त्यांना तत्काळ पापणी मिटायच्या आत रुग्णालयात दाखल केले.नवरा जर पाॅझिटिव्ह आढळला तर बायको मुलांपर्यंत त्याला पोहोचूच दिला नाही. वा-याच्या वेगाने त्याला हलवला. याचा परिणाम म्हणजे साथ नियंत्रणात आली.संसर्ग वाढलाच नाही.
जेव्हा २२ मार्चला सारा देश थाळया आणि टाळया पिटण्यात मश्गुल होता तेव्हा भिलवाडा जिल्हा आॅपरेशन कोरोनात व्यस्त होता.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे या जोडीला मिळालेले सर्व प्रकारचे सहकार्य व विश्वास यामुळे हे होऊ शकले.आज देशातील सर्व वृत्तपत्रांमध्ये भिलवाडा बद्दल लिहून आले आहे . तर ANN या चॅनेलने तयार केलेला भिलवाडयाचा व्हिडीओ सगळा देश पहात आहे. बातमी खासने जड शब्द टाळून सोप्या शब्दात थोडक्यात ही बातमी तुम्हाला दिली आहे. अधिक विस्तृत कोणाला वाचायचे असेल तर आजचा लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स आहेच.