या मार्मिक म्हणीचा अर्थ तंतोतंत आपल्या आपल्या देशाला लागू होत असल्याची घटना काल घडली.
महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे औषधांची मागणी करत औपचारिकता केली शिवाय ‘औषधे जरी दिली नाही तरी काही फरक पडत नाही पण नंतर बघून घेऊ’? असा दम दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.( थोडक्यात “ चड्डीत रहायचं”)
आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार आरोग्याविषयीचे कोणतेही जागतिक संकट निर्माण झाल्यानंतर एकमेकांना मदत करणे हे प्रत्येकालाच क्रमपारप्त आहे . भारताने अमेरिकेला मदत करणे हा जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने आखलेल्या धोरण व रेडक्राॅस च्या नियमांचा भाग आहे.
आज जगात सर्वशक्तिमान म्हणून अमेरिका ओळखला जातो. या देशाशी खुन्नस अथवा वक्रदृष्टी घेतली तरी त्याचे काय परिणाम होतात हे अफगाणिस्तान , सिरिया, लेबनान , इराण व इराकने अनुभवले आहे. आजमितीस जगातील नव्वद टक्के देश अमेरिकेशी पंगा घ्यायला नको म्हणतात ही पण वस्तुस्थिती आहे. भारताने प्रथमपासूनच थोरल्या जाॅर्ज बुश पासून पुरेसी स्पेस ठेवत अमेरिकेशी सौहार्दाचे संबंध ठेवले होते. मात्र अलिकडील काही वर्षात या महासत्ता असलेल्या देशाला पण आपण दोस्तीच्या ( लंगोटी यार)व्याख्येत घेत प्रमाणापेक्षा अधिक यांच्याबरोबर सलगी केली, पायघड्या घातल्या, मिठया मारल्या? परंतू म्हणतात ना ,मोठी लोकं ही मोठीच असतात ,आपण कितीही त्यांच्याशी बरोबरी साधली तर ते वेळ येताच आपली जागा आपल्याला दाखवतात.
तुम्ही मोठे जरूर असाल पण म्हणून आम्ही लहान होत नाही. तुम्ही आमच्याकडे डोळे वटारू शकत नाही. हा १३० कोटींचा देश महापुरूष , महामानव व क्रांतीकारकांची पार्श्वभूमी असलेला आहे. आमचा नेता, आमच्या देशाचा पंतप्रधान शेवटी आमचा आहे. अपमान खपवून घेणार नाही.