पिंपरी :- मद्यपींना दारूमुक्त करण्याचे काम करणाऱ्या अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दि. २ जून रोजी आकुर्डीतील श्रमशक्ती भवनमध्ये सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान जनजागरण सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी हि स्त्री व पुरुषांची एक संघटना आहे. यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात. ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तऱ्हेने सभासद आपले स्वतःचे तसेच दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.
संघटनेत सामील होण्यास कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. कुठलाही धर्म, सामाजिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही. संघटनेचे ध्येय एकच आहे की, दारूपासून स्वतःला दूर ठेवणे आणि ज्यांना दारूपासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे अशा इतर मद्यपीडित लोकांना मदत करणे.
दारूच्या आहारी गेलेल्या दोन अमेरिकन नागरीकांनी १९३५ साली या संस्थेची अमेरिकेत स्थापना केली. दारूमुक्तीसाठी आज हि संस्था १८० देशात झटत आहे. मुंबईत मुख्य कार्यालय असून महाराष्ट्रभर शाखा कार्यरत आहेत. दारू जास्त प्रमाणात आणि सातत्याने पिणे हा एक मद्यपाश आजार असल्याचे अमेरिकन डॉक्टर असोसिएशनने सिद्ध केले आहे.
या संस्थेच्या माध्यमातून जगभरात लाखो मद्यपी व्यसनमुक्त झाले. दारूपासून आनंदाने लांब राहण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाच्या बारा पायऱ्या येथे सांगितल्या जातात व त्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. दारुड्याच्या सहवासात असल्याने हैराण झालेल्या पत्नीसाठी व कुटुंबियांसाठी या संघटनेची सहयोगी संस्था ‘अल ॲनॉन’ समुपदेशन करते.
या चळवळीत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या सभेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क: 8888128883 / 7218976474
पुणे इंटरग्रुप ऑफिस : 020 – 24468087
अँड्रॉइड मोबाईल अँप : AA Pune (Official)
Website: www.aagsoindia.org