शेकापचा आधार वगळता आख्ख्या मावळ मतदारसंघात सगळीकडेच दाटलेला अंधार, पिंपरी महापालिका, राज्य तसेच केंद्रात अशी कुठेच सत्ता नसून देखील शून्य राजकीय अनुभव असलेल्या आपल्या पूत्राला पुढे आणण्याच्या अजित पवार यांच्या प्रयत्नांना अखेर सुरूंग लागला.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा निकाल आज दुपारी बारा वाजता स्पष्ट होताच एके काळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात एकदम स्मशनशांतता पसरली. काय चुकले? कुठे कमी पडलो? कोणी काम केले नाही? अशी चर्चा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात करू लागले होते.
पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो हे ठामपणे सांगण्यास राजकारणात उभे आयुष्य घालविलेले देखील मान्य करायला कालपर्यंत तयार नव्हते. पवार या नावाचे वलय, महाराष्ट्रावर असलेले त्यांचे गारूड व मनी, मसल, मॅनपॉवरने बलदंड असलेल्या शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे पूत्र असलेले पार्थ पराभूत होऊच शकत नाही असा सर्वांचा कयास होता.
मात्र सुनामी लाट यावी त्याप्रमाणे संपूर्ण देशभरात मोदी विरोधकांची उडालेली दाणादण पार्थ पवार यांना मात्र वाचवू शकली नाही. वास्तविक पार्थ पवार हे उमेदवार म्हणून जेव्हा घोषित झाले तेव्हाच ते खासदारकीच्या लढतीत तूल्यबळ ठरू शकत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यांचे भाषण, त्यांचे खासगी फोटो ट्रोल झाल्यानंतर तर ते अधिकच खोलात जाऊ लागले. मात्र शरद पवारांचा सर्वांशी असलेला स्नेह काहीतरी चमत्कार घडवेल… अशी अंधूकशी आशा प्रत्येकाला होती.
राजकीय अनुभव शून्य असलेल्या पार्थ यांनी हट्ट धरून रिंगणात उतरण्याची केलेली घाई, आणि अजित पवार यांची प्रत्येक गोष्ट रेटून नेण्याची स्टाईल अखेर त्यांना महागात पडली. पार्थच्या उमेदवारीवरून ज्येष्ठ नेते शरद पवारच सुरूवातीला नाखूश असल्याची चर्चा होती. मात्र ‘बुँद से गयी वो हौद भरके वापस नही आती’ या म्हणीप्रमाणे महाराष्ट्रात जरी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी पार्थच्या हरण्याने सगळं मुसळ आता केरात गेलं आहे. पवारांच्या तिसऱ्या पिढीला लागलेला हा ब्रेक इतका मोठा आहे की, त्यातून सावरणे राष्ट्रवादीला मावळमधून अर्थातच पिंपरी चिंचवड मधून कठीण ठरणार आहे. मावळ लोकसभेमधील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ज्या पिंपरी चिंचवडने १९९१ मध्ये नवोदित असलेल्या अजित पवार यांना लोकसभेवर पाठवलं तीच स्टाईल, तीच चाल अजित पवारांनी आपल्या पूत्रासाठी यंदा वापरली मात्र काळ आणि वेळ चुकली होती हे अजित पवारांनाही आता मान्य करायची वेळ आली आहे.