नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराची लक्तरे दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ-व्हिज्युअल) पंचनामा करत महाराष्ट्राच्या राजकीय आखाडयात भल्या भल्यांची दातखिळी बसवणारे राज ठाकरे यांच्या भाषणाच्या तयारीसाठी मनसेची ‘ब्रेन टिम’ घेत असलेली मेहनत पाहून सर्वच राजकीय पक्ष अवाक होत आहेत. यानिमित्ताने दस्तावेज अर्थातच डॉक्युमेंटेशनला किती महत्त्व आहे याची महती आता सगळ्यांनाच पटत आहे.
एकही उमेदवार रिंगणात नसलेल्या मनसेने ‘मोदी हटाव’ या एकाच ध्येयपूर्तीसाठी केवळ आपल्या सभांमधून उभ्या महाराष्ट्राला गारूड घातले आहे. गुढीपाडव्याला मुंबईतील सभेपासून त्यांची झालेली सुरूवात व काँग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून त्यांच्या सभेसाठी होणारी मागणी ही महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासात नोंद घेणारी बाब ठरली आहे.
मुळात राज ठाकरे हे ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. इव्हेंट मग तो कुठलाही असो त्यांच्या प्रत्येक सभा, मेळावा, आंदोलनास एक ‘राज ठाकरे किनार’ असते. त्यांच्या भाषणाला होणारी गर्दी, टिव्ही चॅनेलकडून त्यांच्या सभांना मिळणारे लाईव्ह कव्हरेज व वृत्तपत्रातून मिळणारी ठळक प्रसिद्धी या गोष्टी मागील दहा-बारा वर्षापासून नित्यनेमाने त्यांना लाभत असल्या तरी यंदा युद्धाच्या मैदानात रणगाडे घेऊन उतरावे अशा पद्धतीने ऑडिओ-व्हिजुअल यंत्रणेसह स्टेजवर त्यांचे अवतरणे… हे पाहणे व अनुभवणे एक नेत्रदिपक सोहळा ठरतोय. लोकशाहीप्रेमी कोणताही माणूस त्यांच्या मतांशी सहज सहमत होतो हे वास्तव आहे.
राज ठाकरे हे पूर्वीही स्टेजवर भाषणे देताना आकडेवारीची कागदपत्रे, पुरावे अशा लवाजम्यासह येत असत. परंतू कोणतीही गोष्ट पटवून दयायची असेल तर दृकश्राव्य माध्यमातून ती प्रचंड अपील होते हा मानसशास्त्रीय सिद्धांत असल्याने तीच मेख ओळखून ते आपल्या सभांमधून ती वापरत आहे.
नरेंद्र मोदी यांना रडारवर घेण्याची तयारी मागील सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी आखली होती. राज ठाकरे यांना बौद्धिक मटेरियल पुरविणारे, राजकीय अभ्यासक अशी ओळख असलेले पुण्यातील अनिल शिदोरे यांचा त्यांच्या ‘ब्रेन टिम’ मध्ये विशेष सहभाग असतो.
मोदींचे निर्णय, त्याचे उमटलेले पडसाद, विरोधी प्रतिक्रिया, मोदींनी दिलेली उत्तरे, सत्तेपूर्वीचे मोदी, त्यावेळची त्यांची भाषणे, व्हिडिओ, मोदींच्या भाषणातील पोकळ घोषणा, तसेच भाजपचे वस्त्रहरण होईल अशी सगळी माहिती एकत्रित गोळा केली जाते. विषयानुसार त्यांचा क्रम लावला जातो. व्हिडीओ गोळा करून त्याची लायब्ररी तयार केली जाऊन मग राज ठाकरे जी माहिती मागणार ती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. डिजिटल स्क्रीन, साऊंड क्वालिटी, व्हिडीओची स्पष्टता, याच्यावरही श्री. शिदोरे यांच्या नेतृत्वाखालील टिमचे बारकाईने लक्ष असते.
हि सगळी यंत्रणा सज्ज असली तरी सगळ्यात महत्त्वाचा पॉईन्ट असतो ते म्हणजे, राज ठाकरेंचे भाषण. त्यांची उभे राहण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, मुद्दा मांडतानाची देहबोली, लोकांच्या दैनंदिन भाषेत साधला जाणारा संवाद याचा वाटा ९० टक्के इतका आहे. उदाहरणाची फोड करून ती फळ्यावर मांडणे व समोरच्यांना पटणे हि शैली असलेला महाराष्ट्रातील एकमेव वक्ता तरी सध्या राज ठाकरेच आहे.
“राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम काही होत नसतो, लोकं फक्त ऐकतात” असा चिडका स्वर विरोधक मांडतात. मात्र एक उदाहरण दयायचे झाल्यास २०१४ साली मावळमधून शेकाप तर्फे लढत असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्यासाठी राज ठाकरे यांनी वाल्हेकरवाडीत घेतलेल्या एका सभेने जगतापांची कशी डोकेदुखी केली होती व लोकांना कसा अपेक्षित मेसेज गेला होता हे मावळची जनता विसरलेली नाही.
तरूण पिढी हीच राज ठाकरेंची आजमितीस मोठी ‘ॲसेट’ आहे. ती फिदा होत आहे यातच त्यांचे यश दडले आहे.