मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सेना व भाजपमध्ये निर्माण झालेल्या विसंवादामुळे प्रचाराला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी अखेर संघ व भाजपच्या जुन्या जाणत्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या शहरातील भाजप मंडळींनी आज एकत्र येऊन खासदार बारणेंशी प्राधिकरणात बंद दरवाजाआड चर्चा केली.
शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप या बैठकीला अनुपस्थित होते की त्यांना बोलावले नव्हते या प्रश्नाचा उलगडा होऊ शकला नाही. शहरात खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ठोस व ठाम निर्णय अद्याप न झाल्याने सेनेचे उमेदवार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजप उतरलेली नव्हती.
बरोबर मागील आठवडयात गुरूवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी जगताप यांची घरी जाऊन भेट घेतली होती. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही लक्ष्मण जगताप यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान आज सकाळी आठ वाजता संघ कार्यकर्त्याचे व पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे केंद्र अशी ओळख असलेल्या वीर सावरकर सांस्कृतिक भवन येथे खासदार बारणे, खासदार अमर साबळे, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे हे सारे एकत्र आले. बंद दरवाजाआड यांच्यामध्ये सुमारे दोन तास खलबते झाली.
या बैठकीत नेमके काय झाले ही माहिती समजली नसली तरी जगतापांशिवाय भाजप मंडळींनी यामध्ये घेतलेला सहभाग व पुढाकार चर्चेचा विषय बनला आहे.