गुरूवारी आमदार व शहर भाजप अध्यक्ष लक्ष्मण जगताप व खासदार श्रीरंग बारणे यांची भेट झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आणि शहरात प्रचंड राजकीय खळबळ उडाली. खरंच ही भेट झाली का? जर भेट झाली तर कोणाच्या मध्यस्थीने? कुणाच्या सांगण्यावरून? भेटीत काय चर्चा झाली? किती वेळ हे दोघे एकत्र होते? असे एक ना अनेक प्रश्न, उपप्रश्न, चर्चा, गप्पा, अफवा यांना आज गेल्या दोन दिवसात प्रचंड ऊत आला आहे.
बातमी खासच्या टिमने शहरातील राजकीय गप्पांचे चर्चेचे अड्डे असणाऱ्या विविध ठिकाणी कानोसा घेतला. आणि लोकांच्या आवडीचा विषय असलेल्या राजकारणाच्या या फडावर नेमके काय चर्चिले जात होते ते टिपून खास आपल्यासमोर आम्ही ते पेश करीत आहोत.
ट्रेलर रिलीज परंतू पिक्चरचा सस्पेन्स कायम असेच वर्णन करता येईल या भेटीचे…! लोकं राजकारणाकडे व या भेटीकडे कशा अर्थाने बघतात, काय टिप्पणी करतात, हे पाहणं देखील मनोरंजक आहे.
आता आपण पाहूया लोकांच्या प्रतिक्रिया..!
१) अरे… पण फोटो कसा नाय या भेटीचा?
२) बरोबर आहे.. भाऊ, कितीही केला तरी मोठाच आहे, आप्पाने जायलाच पाहिजे होते.
३) भाऊ, आता प्रचाराची सूत्रे हाती घेणार आहे.
४) मला एक कळत नाही, जाहीर सभेत ‘श्रीरंग बारणेंना विजयी करा’ असं भाऊंना म्हणताना कसं वाटंल नाय.
५) छया… लक्ष्मण भाऊंचा एवढा अपमान केलाय की, भाऊ तात्पुरतं तोंडावर गोड बोलून बरोबर काम दाखवणार.
६) आप्पाचं काम नाईलाजाने आता भाऊंना करावंच लागेल, नाहीतर पुढे विधानसभेत आपला आप्पा मग भाऊंना सोडणार नाही.
७) ‘दाजी… पण हयो पटवर्धन कसा काय मधी कडमडला.
८) मी शंभर टक्के सांगतो, भाऊ आणि त्यांची लोकं फक्त वर वर काम करणार..!
९) भाऊंची दुश्मनी राष्ट्रवादीशी पण आणि बारणेंशी पण एकाचवेळी आलीय.
१०) भाऊ आता आप्पांचा प्रचार करणार पण त्यांचे कार्यकर्ते काय करायचं ते करणारच.
११) भाऊंना एकवेळ आप्पा खासदार होणं परवडलं पण तो पार्थ आला तर पवार घराणं पुन्हा शहराच्या डोक्यावर बसणार त्याचं काय?
१२) माझं तर आत्ताचं भाऊंशी बोलणं झालं, ते मला म्हणाले, युतीचा धर्म पाळावा लागणार आहे.
१३) आयला, हया आप्पांचं पण नशीब आहे, शिवसेना वाढवली नाय, नगरसेवक निवडून आणले नाय, आता दोन दोन वेळा खासदार होणार.
१४) त्या टायरचा फोन आला असणार भाऊंना, नाही तर भाऊ कसला भेटतोय आप्पाला… (टायर म्हणजे सीएम)
१५) माझ्याकडं तरी शंभर टक्के माहिती आहे की, ही भेट संघाच्या माध्यस्थीमुळेच घडली.
१६) तुला सांगतो, बारणे व भाऊ एकमेकांशी हाय-बाय पुरतेच बोलले नंतर शंकर जगतापांनीच बारणेंना अटेन्ड केले.
१७) जर भाऊंनी काम न करता आप्पा निवडून आलेच तर भाऊंचे स्थान डळमळीत झालेच समज.
१८) भाऊंनी आप्पांचे काम केले आणि तरीही पार्थ निवडून आला तर भाऊंच्या कार्यकर्त्यावर संशय येणार आणि भाऊंवर टोपर राहणार.
१९) तवा कुठं होते बारणे जवा भाऊंच्या घरी दुख झालं होतं तवा बारणे आलते का तरी?
२०) भाऊ इतक्या सहजासहजी स्वस्त होणार नाही मदतीचा हात देणार पण शेवटच्या क्षणी.
२१) मोदींना पंतप्रधान करायचं असंल तर भाऊंना बारणेंच्या चूका विसरून मदत करावीच लागेल.
वाचक हो, तर अशा चर्चा व गप्पांचे नमूने आम्ही गोळा केली..! काही गप्पा व चर्चा इतक्या खालच्या थरातील होत्या व कंबरेखाली वार करणाऱ्या होत्या की त्या आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही.