मावळ लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम जसजसा तापू लागला आहे तसतसे राष्ट्रवादीने आपल्या भात्यातील बलाढय ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मावळमधील एकेक भाग वाटून देण्याबरोबर खुद्द शरद पवार यांनी आता आपल्या ५२ वर्षाच्या राजकीय अनुभवाचा व ताकदीचा कस पणास लावण्यास सुरूवात केली आहे.
पार्थ यांची उमेदवारी पवार घराणे किती गांभीर्यपूर्वक लढवित आहे, याची साक्ष पटण्यास आता सुरूवात झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी मागील आठवडयात लोणावळा व मावळच्या काही खेडयांमध्ये गाठीभेटी घेतल्या होत्या. तर अजित पवार हे २१ मार्च पासून दर तासाला प्रचाराचा रिव्हू घेत असल्याचे चित्र आहे. काल मावळमध्ये पार्थ यांच्या आत्या अर्थातच सुप्रिया सुळे यांनी गाठीभेटी घेऊन प्रचारात जोर आणला. तर त्याच वेळी अजित पवार हे पुन्हा आझमभाई पानसरे यांच्या घरी सायंकाळी ५ च्या सुमारास धडकले. आझमभाई जरी भाजपात असले तरी आता त्यांचे चिरंजीव निहाल पानसरे हे राष्ट्रवादीत आलेले असल्याने आता पानसरेंच्या घरी पवारांनी जाण्यातील गूढ संपले आहे.
पुणे जिल्हा परिषदेत आतापर्यंत राष्ट्रवादीचे जितके अध्यक्ष व पदाधिकारी होऊन गेले आहेत त्या सर्वांना आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मावळचे विभाग पाडून त्यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द केली आहे.