———-
(विजय जगताप)
‘सन्मानाने राजीनामा दया’असे सहा महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही ऐकले नसल्याने अखेर निवडणूकीपूर्वीच पदावरून जाण्याची पाळी मावळते अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यावर आज आली.
तब्बल सहा वर्ष शहराध्यक्षपदावर राहिलेले संजोग वाघेरे पाटील यांना बदलण्याची तयारी राष्ट्रवादीने तशी एक वर्षापूर्वीच केलीच होती.१३ आॅक्टोबर २०२१ रोजी आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाकरी फिरवण्याच्या हालचालीचा भाग म्हणून अजितदादा पवार यांनी संजोग वाघेरे यांना “राजीनामा द्या “असे सांगितले. मात्र राजीनामा द्यायला हरकत नाही फक्त पालिका निवडणूका होईपर्यंत अध्यक्षपद राहिले पाहिजे या प्रयत्नात असलेल्या वाघेरे पाटील यांनी मग थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत “निवडणूका होईपर्यंत काम करू दया”
असे साकडे घातले. पवार साहेबांनीही तशी संमतीची पसंती दर्शविली. यासाठी शहरातील मराठा लाॅबीचा वाघेरे पाटलांच्या मागे असलेला प्रयत्न यशस्वी ठरला.
मात्र दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२१ च्या मध्यावर पुन्हा अजितदादांकडून अजून कसा राजीनामा दिला नाही? असा निरोप आला.
अखेर निवडणूकांपूर्वीच शहरात पक्षसंघटनेतील बदलांवर ठाम असलेल्या अजितदादा पवार यांनी भाकरी फिरवूनच टाकली.विशेष म्हणजे नवीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा आल्हाट व युवक अध्यक्ष शेख हे तिघेही भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहे.
भाजप शहराध्यक्ष महेश दादा लांडगे यांची नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नातील हा भाग आहे. शिवाय नव्या टिमच्या जोडीला विलास लांडेही असणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघाची बाजू महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल कलाटे , राजेंद्र जगताप, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप हे सांभाळतील तर पिंपरी विधानसभा क्षेत्रात आमदार अण्णा बनसोडे , आझमभाई पानसरे, योगेश बहल अशी तगडी फौज तैनात करून भाजपला विळखा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.