( विजय जगताप)
“माझ्या शहरात दीदी येत आहेत आणि त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होतोय तर शहरातील नागरिकांच्याच माध्यमातून कररूपी जमा झालेल्या रकमेतील ७५ हजारांची थैली दीदींना देऊन कृतज्ञता व्यक्त करू”असा निर्णय घेऊन आमदार जगतापांनी तो कृतीतही आणला होता.
लक्ष्मण भाऊंचे हे उद्द्गार ऐकून चिंचवडमधील घांगुर्डे दांपत्य सुखावले आणि त्यांच्या डोक्यावरील ओझे व ताण हलका झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर ( अर्थात लतादीदींचे वडील)यांच्या नाटय व संगीत कार्यावर पीएचडी केलेल्या भारतातील एकमेव असलेल्यांपैकी डाॅ वंदना घांगुर्डे होत.आपल्या वडिलांच्या सांगितिक कार्यावर डाॅक्टरेट केलेल्या वंदनाताईंवर सा-या मंगेशकर कुटूंबाची त्यामुळे विशेष श्रध्दा व नितांत आदर. लतादीदी, आशा भोसले , ह्दयनाथ मंगेशकर तर गोव्यातील आपले कुलदैवत मंगेशी देवीनंतर डाॅ वंदना ताई यांना आजही दुसरे स्थान देतात. पिंपरीतील एच.ए. स्कुलमध्ये त्या शिक्षिका आहेत.
लतादीदींना दुसऱ्यांदा या शहरात आणण्याची कामगिरी ‘नादब्रम्ह परिवार’ या त्यांच्या संगीत संस्थेने केली.
रविंद्र घांगुर्डे व वंदना घांगुर्डे या दांपत्याने संगीत कलेच्या माध्यमातून या शहरात उभे केलेल्या दिपस्तंभरुपी कार्याला वंदन करण्यासाठी लतादीदी या शहरात २००४ साली त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला अर्थात (७५ व्या)येण्याचे कबूल केले.मग दीदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त नाटयमहोत्सवाचे आयोजन चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटयगृहात नादब्रम्ह संस्थेने करायचे ठरविले.
लतादीदी शहरात येतच आहे तर ७५व्या वाढदिवसानिमित्त जर ७५ हजार रूपयांची थैली त्यांना कृतज्ञता म्हणून दिली तर या कार्यक्रमाला अधिक उंची लाभेल ,असे वंदना घांगुर्डे यांच्या मनात आले. मात्र एवढी मोठी रक्कम कुठून आणायची व कशी उभारायची? या विवंचनेत त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांनी भेट घेतली.
‘भाऊ,तुम्ही आमदार आहात,दीदींनी शहरात येण्याचं कबूल केलंय, जर दोन – तीन प्रायोजक मिळाले तर दीदींचा यथोचित सन्मान होईल ‘अशी भावना डाॅ वंदनाताईंनी व्यक्त केली
. आमदार जगताप यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ “दीदींचा योग्य सन्मान पिंपरी चिंचवड महापालिका करेल व शहरातील करदात्यांच्या रकमेतून जमा होणारी रक्कम महापालिका त्यांना देईल” असा त्याक्षणी निर्णय घेतला.
लतादीदी या कार्यक्रमाला आल्या. महापालिका आयुक्त असीम गुप्ता, आमदार लक्ष्मण जगताप व तत्कालीन महापौर यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक लतादीदींचा ७५ हजार रूपयांची थैली कृतज्ञतापूर्वक म्हणून देत गौरव केला.शहरवासियांच्या मनात अक्षरश: हा कार्यक्रम कोरला गेला. यावेळी नादब्रम्ह संस्थेने लतादीदींच्या जीवनकार्यावर ‘हृदया’ हा विशेषांक काढला होता त्याचे प्रकाशनही खुद्द दीदींनी यावेळी केले. तीन दिवस चाललेल्या या संगीत नाटयमहोत्सवाने शहरात गर्दीचा उच्चांक मोडला होता.
आमदार जगताप यांच्या शिफारशीवरून तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आणखी २५ हजारांची मदत या संस्थेला दिली. मी माझ्या कुठल्याही मित्राला वा शहरातील नामवंत व्यावसायिकांना सांगितले असते तर पाच मिनिटात १ लाख रूपये कोणीही तुम्हाला दिले असते परंतू माझ्या शहरातील नागरिकांचा एक एक रूपया दीदींसारख्या महान कलाकारांच्या सन्मानाला खर्च व्हावा ही शहराची त्यांच्याबद्दल असलेली उतराई आहे” असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी घांगुर्डे दांपत्यांनी आभार व्यक्त केल्यावर त्याचवेळी म्हटले होते.