——-
(विजय जगताप)
स्मार्ट सिटीतील कामांमुळे रूपडं बदललेला पिंपळे सौदागर परिसर आख्खाच्या आख्खा एकाच प्रभागात आला असून ‘सोसायट्यांचा बालेकिल्ला ‘अशी नवी ओळख सिध्द करणारा ठरला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीची प्रभाग रचना आज जाहीर झाली. शहरात भौगोलिक दृष्टया सर्वात मोठा प्रभाग च-होली ठरलाय आणि सर्वात लहान सॅन्डविक काॅलनी हा प्रभाग निश्चित झाला. तर क्षेत्रफळाने तसा लहान परंतू उंचीने व लोकसंख्येने जास्त असा चौरसाकृती प्रभाग म्हणून पिंपळे सौदागर हा परिसर रचनेत वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
औषधालाही झोपडीवजा घर नसलेल्या या प्रभाग क्रमांक ४० ( पिंपळे सौदागर)मध्ये ९५ टक्के सोसायट्या आल्या असून उर्वरित पाच टक्क्यांमध्ये गावठाण परिसर आला आहे.
शहरातील सर्वाधिक सोसायटयांचा एकत्रित परिसर म्हणून पिंपळे सौदागर ओळखले जाते.मुंबईतील मलबार हिल व पुण्यातील कोरेगाव पार्कनंतर सर्वाधिक देखणा, उच्चमध्यमवर्गीयांचा परिसर म्हणून याची ओळख आहे. या भागात आपली सामूहिक ताकद मोठी असल्याचा साक्षात्कार मागील निवडणूकीत येथील सोसायटीधारकांना आला होता. ‘आपणच आपला नगरसेवक निवडू ‘असाही प्रयत्न या भागातील काही सोसायटीच्या मंडळींनी करून पाहिला होता. रहाटणीचा अर्धा भागही मागील निवडणूकीत समाविष्ट होता.परंतू सोसायटीवाल्यांचा प्रयोग काही सक्सेस झाला नाही.
सध्या राष्ट्रवादीचे नाना काटे, शितल काटे तर भाजपचे शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे हे चौघेजण या भागाचे प्रतिनिधीत्व करतात.
मागील निवडणूकीत पराभव वाटयाला आलेल्या कुंदा भिसे यांनी उन्नती फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आपल्या नावाचा जागर शेकडो कार्यक्रम घेऊन मागील पाच वर्षात तेवत ठेवला आहे. तर तीन काटे व एक कुटे यांनी आपापल्या ताकदीने व स्मार्ट सिटीतील कामांच्या जोरावर आपला खुंटा मजबूत करून टाकला आहे.