( विजय जगताप)
जगभरात प्रचंड गाजत असलेला व विशेष करून वकिली क्षेत्रातील प्रत्येकाने आवर्जून पहावा अशी नोंद ठरलेल्या ‘ जयभीम’ या पिक्चरच्या खास शो चे आयोजन पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये नुकतेच करण्यात आले.
नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला होता.संविधान दिनी ( २६ नोव्हेंबर) आयोजित हा चित्रपट पाहण्यासाठी वकिलांनी गर्दी केली होती. मूळ तमिळ चित्रपट असलेला हा चित्रपट देशभरातील सर्व भाषांमध्ये डबिंग करण्यात आला असून सोशल मिडियातील ॲमेझाॅन प्राईम व्हिडीओवर तो प्रदर्शित झाला आहे.
विशेष म्हणजे ‘जयभीम’ मध्ये कुणीच कुणाला ‘जयभीम’ म्हणालेलं नाही वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार फोकस केले गेलेले नाहीत.
एक वंचित,आदिवासी समूहातील गरीब ,निरक्षर, गरोदर स्त्रीला न्याय मिळवून देण्याचा जो झंझावाती न्यायनिष्ठ प्रवास या आख्ख्या सिनेमात अॅडव्होकेट के. चंद्रुच्या साहाय्याने दाखविला आहे .तो न्यायापर्यंतचा अफाट,अचाट, असाधारण, अथक प्रवास म्हणजे ‘जयभीम’!
“भारतीय संविधान आणि कायदा यापुढे सर्व समान आहेत,सत्याची ताकद, प्रामाणिकपणा, संवेदनशिलता, तत्वांशी असणारी बांधिलकी काय असते? व त्याचा प्रभाव किती असतो? हे अनुभवायचे असेल तर आज ‘जयभीम’ ला पाहण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया ॲड अतिश लांडगे यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली.
या चित्रपटाच्या शो पूर्वी सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड अरविंद आव्हाड यांचा विशेष
सत्कार व त्यांचे ‘ संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.पिंपरी न्यायालयातील न्यायाधीश डी.आर.पठाण,आर.एस.वानखेडे,आर.आर.काळे,पी.सी.फटाले,एन.टी.भोसले यावेळी उपस्थित होते.
या दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षः- ॲड.सचिन थोपटे , उपाध्यक्षः- ॲड.गौरव वांळुज , सचिवः-ॲड.निखिल बोडके , महिला सचिवः- ॲड.प्रियांका सुरवसे ,सहसचिवः-ॲड.सुनील रानवडे , खजिनदारः-ॲड. अनील पवार , हिशेब तपासनीसः-ॲड.गोरख मकासरे ,सदस्य ॲड. संतोषी काळभोर,ॲड.स्नेहा कांबळे,ॲड.मंगेश खराबे,ॲड.महेश मासुळकर,ॲड.सारिका मोरे,ॲड.ऐश्वर्या सिरसाठ यांनी पुढाकार घेतला होता.