( विजय जगताप)
सकाळी सात नाही वाजले तोच ओळखी पाळखीचे, जवळचे, दूरचे, नात्यातले, इकडून तिकडून ओळख काढलेल्यांचे फोन यायला सुरूवात होते…प्रत्येकालाच आशा असते, परंतू वेळ अशी आहे की खोटं बोलता येत नाही, करतो-बघतो म्हटलं तर ते पाठ सोडत नाही व खरी परिस्थिती सांगितली तर त्यांचे समाधान होत नाही? ‘ तुम्ही काही तरी कराच’..या आर्जव व विनंतीमुळे आम्ही हतबल झालोय..!
पिंपरी चिंचवड शहरातील तीनही आमदार व पंधरा-वीस नगरसेवकांशी बातमी खासने आज संपर्क साधला असता प्रत्येकाने आपली व्यथा व असहाय्यता प्रकट करत संकट इतके गंभीर आहे की याचना करणा-या लोकांच्याच पाया पडण्याची व हात जोडण्याची वेळ दररोज आमच्यावर येत असल्याचे या मंडळींनी सांगितले.
सर्वाधिक फोन ‘रेमडिसिव्हर मिळवून दया’ यासाठी येतात. बेड, आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासाठीही फोन सतत चालूच असतात.सध्या शहरातील सर्वच हाॅस्पिटल व डाॅक्टरांवर पडत असलेला ताण पाहता व रूग्ण संख्येचा विस्फोट दररोज वाढत असताना ‘ना त्यांच्यावर दबाव टाकू शकत की ना दुस-यांना नका पाहू माझ्या पेशंटला पहा असे म्हणू शकत’ अशा स्थितीत जे उत्तर समोरून मिळेल ते मूकाट ऐकावे लागत असल्याची खंत राजकारण्यांनी बोलून दाखविली.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुणे जिल्हयात आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये तर रोजची कोरोना रूग्णांची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.
मदतीसाठी सर्वाधिक फोन व प्रत्यक्ष भेटून साकडं घालणं यासाठी लोक सर्वाधिक पसंती राजकारणी मंडळींनाच देत असल्याचे चित्र आहे. एरव्ही प्रत्येक काम चुटकीसरशी व एका फोनवर करणा-या नगरसेवक, आमदार व राजकीय पदाधिका-यांना हाॅस्पिटल व डाॅक्टरांकडून नकार ऐकावा लागत असल्याने त्यांना ना दम देता येत, ना शिवीगाळ करता येत ? अशी त्यांची अवस्था झाली आहे.
चारच दिवसांपूर्वी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी आपली हतबलता थेट सोशल मिडियावर व्यक्त करून आपली निराशा प्रकट केली. पाठोपाठ नगरसेवक प्रमोद कुटे, अनुराधा गोफणे यांनीही लोकांच्या मदतीला न्याय देऊ शकत नसल्याची भावना फेसबुकवर व्यक्त केली.
सत्ताधारी भाजपचे सर्वच नगरसेवक व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे नगरसेवक, तसेच पदाधिकारी विविध राजकीय पक्षांची मंडळी, प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते देखील लोकांच्या फोनपासून सुटलेले नाही.मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या सचिन चिखले यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी अॅमब्युलन्स लवकर आली नाही म्हणून स्वत: पीपीई कीट घालून मृतदेह हलविण्याचे काम केले.