( विजय जगताप)
मुंबई पोलीस व त्यांच्या कुटूंबियांच्या वतीने सहारा वृध्दाश्रमास आर्थिक मदत तसेच आरोग्यविषयक साहित्य काल प्रदान करण्यात आले.
पोलिसांनाही माणूसकी आहे, संवेदना आहेत व त्यांनाही मदतीची सवय लागावी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या विभागातील ( वर्सोवा व विलेपार्ल)मुंबई पोलीस दलाला व त्यांच्या कुटूंबियांना नुकतेच मदतीचे आवाहन केले होते आणि पाहता पाहता त्यासाठी शेकडो हात उभे राहिले.
मावळ तालुक्यातील कुसवली येथे सहारा सोशल फाऊंडेशनच्या वतीने अनाथ व निराधारांसाठी वृध्दाश्रम उभारण्यात आले आहे.पूर्णत्वास आलेल्या या वृध्दाश्रमासाठी काही अत्यावश्यक प्राथमिक खर्चिक गरजा व वस्तूंसाठी वृध्दाश्रमाच्या वतीने सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले अविनाश धर्माधिकारी यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला. आपल्या ३२ वर्षाच्या सेवेत समाजोपयोगी कार्यात सदैव अग्रेसर असलेले व स्वतंत्र ठसा उमटविलेल्या आणि मागील वर्षीच राष्ट्रपती पदक पारितोषिक मिळविलेल्या धर्माधिकारी साहेबांनी सहारा वृध्दाश्रमाशी संपर्क साधला. नेमकी काय मदत अपेक्षित आहे, कोणत्या वस्तू हव्यात,याची त्यांनी माहिती घेतली.
दोन -तीनदा त्यांनी फोन करून अधिक विस्तृतपणे फोटो मागवून वृध्दाश्रमाविषयी जाणून घेतले.सहाराचे संचालक विजय जगताप यांच्याबरोबर झालेल्या संवादात ते एकदाही ‘मी एसीपी आहे किंवा पोलीस खात्यात आहे ‘ असे बोलले नाही. त्याच दरम्यान सहाराला मदतीसाठी जे अनेक फोन येत होते त्यांच्यामधीलच हा एक फोन असावा असेच सर्वजण समजत होते.
पंधरा दिवस लोटल्यानंतर अचानक काल धर्माधिकारी यांनी वृध्दाश्रमात फोन करून सांगितले की ,मी मुंबईहून उदया तुमच्याकडे येतोय ,वृध्दाश्रमाची प्रत्यक्ष पाहणी होईल ,असे म्हणत गुगल लोकेशन पाठवा’असे जगताप यांना म्हटले.
सांगितल्यानुसार ते आले, त्यांच्या गाडीवरून तसेच सहका-यांच्या वेशभूषेवरून ही सगळी मंडळी पोलीस खात्यातील असल्याचे संस्थाचालकांनी ताडले.
सर्व परिसर फिरल्यानंतर तब्बल दोन तास ते संचालक जगताप, सौ जगताप,संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड लक्ष्मण रानवडे यांच्याशी गप्पांमध्ये रंगले.सेंद्रीय पध्दतीने पिकविला जाणारा येथील भाजीपाला, सहारा सोशल फाऊंडेशनची शाळा तसेच विविध उपक्रम त्यांनी आस्थेने जाणून घेतले.त्यांनीही पोलिस खात्यातील आपले अनुभव, कर्तव्यात कसूर न करता लोकांच्या सोडविलेल्या अवघड व अडचणीच्या समस्या, मुंबई पोलिस दलाची विशेषता व गुणवत्ता, सामाजिक काम करताना नागरिकांचे मिळणारे सहकार्य आदी चौफेर माहिती दिली.
समाजात पोलिसांबद्दल खुप विश्वास आहे फक्त लोकांना समजून घेतले, कायदा व नियम न मोडता जनतेच्या मदतीला धावता आले तर लोकं पोलिसांसाठी काहीही करायला तयार होतात ,असा मला विश्वास असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले.
उर्मट, चिडखोर, मग्रुर असा पोलिस दलाबद्दल जो चेहरा निर्माण झालाय तो बदलण्याचा तसेच जनता व पोलिसांमध्ये एक वेगळे नाते तयार करण्याचा मी प्रयत्न करतो आहे , जेवढं मला शक्य होईल तेवढं करणार ‘असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.
आज तुमच्या सहारासाठी मी खुले आवाहन केले असते तर रातोरात कायापालट होईल इतक्या सुविधा व मदतीचा ढिग जमा झाला असता परंतू मी तसे न करता माझ्या पोलिस दलाने व त्यांच्या कुटूंबियांनीच फक्त मदत करावी असे आवाहन केले आणि त्यास चांगला प्रतिसाद लाभला.
मी तुमच्या पाठिशी आहे, चांगले कार्य करीत आहात, असा आशिर्वाद निरोप घेताना त्यांनी सर्वांना दिला.या प्रसंगी

” गणवेषाच्या आतही असतो माणुसकीचा झरा |
पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावो जरा ” ||
या
कवी फ. मु. शिंदे लिखित ;
जुन्या पोलिसगीताचे स्मरण
यावेळी सर्वांना झाले.